धनंजय जोशीझेन गुरुंबरोबर राहताना एक समजते : प्रत्येक क्षणामध्ये तो क्षणच शंभर टक्के कसा जगावा? कुठलाही प्रसंग असो, या गुरुंचे मन स्थिर असते ! कुठलाही प्रसंग म्हणजे अगदी जीवनाच्या शेवटच्या क्षणीदेखील!एक झेन गुरु आयुष्याचे शेवटचे क्षण त्यांच्या शिष्याच्या सहवासात घालवत होते. शिष्याना वाटले, आपण आपल्या गुरुसाठी काहीतरी विशेष करावे! या गुरुंना बनाना केक खूप आवडायचा. शिष्यांनी जाऊन त्यांच्यासाठी बनाना केक आणला. गुरुंनी तो आनंदाने खाल्ला. त्यांचे शिष्य म्हणाले, ‘मास्टर, आपली ही कदाचित शेवटची भेट आणि शेवटचे क्षण संगतीचे! तुम्ही आम्हाला तुमची शेवटची शिकवण सांगाल का? ती मनात ठेवून आम्ही साधना सातत्याने करत राहू!’गुरु म्हणाले, ‘माझे शेवटचे शब्द - वा, वा, हा केक फारच सुंदर आहे. थँक यू व्हेरी मच !’- तेवढे बोलून गुरुंनी शेवटचा श्वास घेतला.दुसरी गोष्ट! आणखी एक झेन गुरु आजारी पडले. शिष्य त्यांना डॉक्टरकडे घेऊन गेले. डॉक्टरने अनेक टेस्ट्स करून घेतल्या. शिष्यांशी खाजगी भेट घेऊन डॉक्टर म्हणाले, ‘गोष्ट खूप गंभीर आहे. तुमच्या गुरुंना कॅन्सर झाला आहे. अगदीच शेवटच्या टप्प्यावर पोहोचलेला मेलॅनोमा आहे!’ शिष्य बिचारे घरी आले. गुरुंना त्यानी ते दु:खदायक निदान सांगितले. रोशी हसू लागले. शिष्यांना आश्चर्य वाटले. ते गुरुंना म्हणाले, ‘इतके गंभीर निदान आणि आपल्याला हसू कसे?’गुरु हसले आणि म्हणाले, ‘ही मोठी गंमतच आहे. अरे बाबांनो, मी कधीतरी जाणार ते मला माहीत होतंच. फक्त कशाने जाणार तेच माहीत नव्हतं. तुम्ही आज तो सस्पेन्स सोडवून टाकला म्हणून मला हसू आलं. आता कसलीच काळजी राहिली नाही!’मी ह्या दोन गोष्टी का सांगतो? साधनेचं मर्म काय? प्रत्येक क्षण जसा समोर येईल तसा अनुभवावा ! मग तो आयुष्याचा पहिला क्षण किंवा शेवटचा - फरक नाही. सान सा निमच्या संगतीत मी हेच शिकलो.
झेन कथा - क्षण, जसा येईल तसा...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 1:43 AM