अहमदनगर : जिल्ह्यातील पहिले कोविड रुग्णालय बूथ हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात आले होते. गेल्या वर्षभरात या रुग्णालयात हजारो रुग्ण बरे झाले असून, महापालिकेकडून बूथ हॉस्पिटलला १ कोटी ९० लाख रुपये अदा करण्यात आले आहेत, अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली.
कोरोना संकट काळात बूथ हॉस्पिटलने मोफत उपचार केले. वर्षभरापासून कोरोना रुग्णांवर उपचार केल्याचे बिल मिळावे, यासाठी रुग्णालयाचा पाठपुरवा सुरू होता. परंतु, निधी उपलब्ध नसल्याने महापालिकेकडून बिल अदा केले गेले नाही. जिल्हा नियोजन समितीकडून महापालिकेला ५ कोटींचा निधी प्राप्त झाला. या निधीतून बूथ हॉस्पिटलचे बिल अदा करण्यात आले आहे. रुग्णालयाला १ कोटी ९० लाखांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निश्चित, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा नियोजनचे अधिकारी नीलेश भदाणे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, अनिल लोंढे आदी उपस्थित होते. संग्राम जगताप पुढे म्हणाले, कोरोना काळात केलेल्या सेवेमुळे बूथ हॉस्पिटलचे नावलौकिक झाले आहे. कोरोना आजार हा नवीन असताना नगर जिल्ह्यातील कोणतेही हॉस्पिटल कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुढे आले नव्हते. मात्र, बूथ हॉस्पिटलने कुठलाही विचार न करता कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू केले. कोरोनाबाबत नागरिकांच्या मनात मोठी भीती निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत डॉक्टर, नर्स, आरोग्य सेविका, प्रशासनाने जीव धोक्यात घालून काम केले. त्यांच्या धाडसाचे कौतुक केले पाहिजे, असे जगताप म्हणाले.
...
०७ बूथ हॉस्पिटल