नेवासा : शहरातील गावठाण हद्दीतील अनेक रोहित्रांवरील वाढलेला लोड, रोहित्र जळण्याचे वाढलेले प्रमाण, त्यातून निर्माण होत असलेल्या समस्या, काही गावातील वाड्यावस्त्यांवरील नवीन रोहित्रांची गरज, वीज जोडणीत असलेल्या अडचणी निवारण करून गावठाण हद्दीतील विद्युत पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी १ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली आहे. यासाठी मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी पाठपुरावा केला.
चांदा येथील चांगदेव दहातोंडे रोहित्र, शास्त्रीनगर, खडकवाडी गावठाण, मुरगे वस्ती, भालके वस्ती, प्राथमिक आरोग्य केंद्र येथील ६ रोहित्रांचा समावेश आहे. माका येथील सरपंच वस्ती, कोकाटे वस्तीवर याप्रमाणे २ आणि मुकिंदपूर जावळे रोहित्र १ अशा एकूण ९ रोहित्रांच्या क्षमता वाढीला मंजुरी देण्यात आली आहे. काही रोहित्रांची क्षमता २५ वरून ६३ केव्हीए तर काही रोहित्रांची क्षमता १०० वरून २०० केव्हीएपर्यंत वाढवली जाणार असल्याचे मंत्री गडाख यांनी सांगितले.
तसेच जळके खुर्द (चिमणेमळा), हंडीनिमगाव (साळुंके रोहित्र), नेवासे बु. (नारायण गिरी प्रतिष्ठान), सौंदाळे (बाबा आरगडे वस्ती), तामसवाडी (चोपडेवस्ती), बहिरवाडी (कालभैरवनाथ), जेऊर हैबती (सरोदे वस्ती), देडगाव (गोयकर व देवकाते वस्ती), मक्तापूर घुले आदी ठिकाणी नवीन रोहित्रांना मंजुरी देण्यात आली आहे.