शिर्डी : साई मंदिर सुरू झाल्यानंतर १६ नोव्हेंबरपासून आतापर्यंत लाखावर साईभक्तांनी साईदर्शनाचा लाभ घेतला. तर या काळात संस्थान प्रसादालयामध्ये सुमारे १ लाख १० हजार साईभक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी दिली.
बगाटे म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई दर्शनाकरिता सामाजिक अंतराचे पालन करुन ठरावीक संख्येनेच भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे साईभक्तांनी आपली गैरसोय टाळण्यासाठी ऑनलाईन बुकींग निश्चित करुनच दर्शनाकरिता यावे. पालखी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पदयात्रींसह पालखी घेऊन शिर्डी येथे येण्याचे टाळावे.
१६ नोव्हेंबरपासून लाखभर साईभक्तांनी ऑनलाईन, टाइम बेस व सशुल्क दर्शन पासेसच्या माध्यमातून साईदर्शनाचा तर प्रसादालयामध्ये सुमारे १ लाख १० हजार साईभक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. या कालावधीत संस्थानचे साईआश्रम भक्तनिवास, व्दारावती भक्तनिवास, साईधर्मशाळा, श्री साईबाबा भक्तनिवास्थान व साईप्रसाद निवासाद्वारे २१ हजार १२४ साईभक्तांची निवासाची व्यवस्था करण्यात आली.