देशभरातील अनेक राज्यांत थैमान घालणाऱ्या लम्पी स्किन आजाराने (Lumpy Skin Disease) आता महराष्ट्रात सुद्धा पाय पसरायला सुरवात केली आहे. त्यातच आता याचा प्रादुर्भाव औरंगाबादमध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत पाच तालुक्यातील जनावरांना लम्पी आजाराची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ३२ जनावरांना लंपीची लागण झाली आहे.
लम्पी हा रोग हळूहळू पाय पसरू लागला आहे. त्यामुळे पशुधन पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. सुदैवाने या रोगाने एकाही जनावराचा मृत्यू झालेला नाही. लम्पी रोगाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी त्यांच्या मतदारसंघातील जनावरांची पाहणी केली. रोहित पवारांनी फेसबुकद्वारे याबाबत माहिती दिली.
मतदारसंघात जनावरांमधील लम्पी या साथीच्या रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी 'बारामती ऍग्रो'च्या माध्यमातून १ लाख लसी दिल्यानंतर गरज लागल्याने आणखी ५० हजार लसी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळं आता एकूण दिड लाख जनावरांना ही लस मोफत देण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसांपासून सरकारी व खासगी डॉक्टर आणि सातारा येथील पशुवैद्यकीय महाविद्यालय यांच्या मदतीने मतदारसंघात वेगाने लसीकरण सुरू आहे. यामुळं १०० टक्के लसीकरण झालेला कदाचित कर्जत-जामखेड हा राज्यातील पहिला मतदारसंघ ठरेल.
दरम्यान, लम्पी रोगाची लक्षणे आढळून आल्यास संबंधित पशुपालकांनी नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेत लेखी स्वरूपात माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. माहिती लपविल्यास कार्यवाही करण्यात येणार आहे. उपचारासाठी शासकीय पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार उपचार करण्यात यावेत. संसर्गित पशू मृत झाल्यास त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ग्रामपंचायत, नगर पंचायत, महापालिका यांच्यावर राहणार आहे. याच्या उपाययोजनेसाठी जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय रॅपिड ॲक्शन टीम तयार करण्यात आल्या आहेत.