अहमदनगर : शासनाने त्वरित प्राध्यापक भरती करावी, घड्याळी तासिका व करार तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात वाढ, २०१३ पासूनचे ७१ दिवसांचे थकीत वेतन, जुनी पेन्शन योजना सुरू करावी, सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करावी आदींसह इतर मागण्यांसाठी जिल्ह्यातील १ हजार प्राध्यापकांनी सोमवारपासून काम बंद आंदोलन सुरु केले आहे.आतापर्यंत प्राध्यापकांच्या मागण्यांसाठी अनेकदा आंदोलने झाली. परंतु शासनाने दखल घेतली नसल्याने मंगळवारी राज्यभर महाविद्यालयीन काम बंद आंदोलन करण्यात आले. त्यात नगर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने प्राध्यापक सहभागी झाले. न्यू आर्टस् कॉलेज, नगर कॉलेज आदींसह जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयांचे दैनंदिन कामकाज विस्कळीत झाले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप मुटकुळे, सचिव डॉ. के. एल. गिरमकर, राज्य सरचिटणीस डॉ. एस. पी. लवांडे, प्रकाश वाळुंज, डॉ. नासिर सय्यद, पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. बाळासाहेब सागडे, डॉ. सुधाकर शेलार, डॉ. भोसले, डॉ. भालसिंग, प्रा. अमन बगाडे, डॉ. अरूण पंधरकर, आर. जी. कोल्हे, डॉ. लक्ष्मीकांत येळवंडे, प्रा. सुभाष दरे, डॉ. श्रीनिवास गायकवाड, डॉ. अनंत हरकळ आदींसह स्थानिक शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी संप यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. संपासाठी कामगार संघटना, विद्यार्थी संघटना, संस्थाचालक, प्राचार्य फोरम, शिक्षकेतर सेवक संघटना, विना अनुदान तत्त्वावरील सर्व प्राध्यापक तसेच विद्यार्थी व पालकांचाही पाठिंबा मिळाल्याची माहिती संघटनेने दिली.
जिल्ह्यातील १ हजार प्राध्यापक संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 11:20 AM