जामखेड : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या, नागरिकांची बेफिकिरी यामुळे १० ते २० मे पर्यंत कडकडीत लॉकडाऊन (जनता कर्फ्यू) पाळण्याचा निर्णय शुक्रवारी व्यापारी, प्रशासन व राजकीय पदाधिकारी यांच्या बैठकीत घेण्यात आला.
शनिवार व रविवार असे दोन दिवस किराणा दुकाने ११ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यात येणार असल्याने नागरिकांनी १० दिवसांचा किराणा खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तहसील कार्यालयात प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्या अध्यक्षतेखाली जनता कर्फ्यूसंदर्भात बैठक घेण्यात आली.
यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे, मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पंचायत समिती सभापती सूर्यकांत मोरे, शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशीद, सावळेश्वर ग्रुपचे संचालक व सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाप्रमुख मंगेश आजबे, व्यापारी सुरेश भोसले आदी व्यापारी उपस्थित होते.
यावेळी नष्टे म्हणाल्या, शहरात कोरोना संसर्गाचा वेग झपाट्याने वाढत असताना मृत्यूच्या संख्येतही वाढ होत आहे. शासनाने संचारबंदी लागू केली असली, तरी काही प्रमाणात शिथिलता दिली आहे. परंतु, जामखेडकरांकडून शासनाच्या सौजन्याचाही गैरफायदा घेत रस्त्यावर गर्दी दिसून येत असल्याने उद्देश सफल होत नाही. सध्या आरोळे कोविड हॉस्पिटल व जम्बो हॉस्पिटलला असे ८१२ रुग्ण उपचार घेत आहेत. शहरातील कोरोना आकडा दररोज ७० ते ८० च्या आसपास आहे. शहरातील २६१ रुग्ण उपचार घेत आहे. त्यामुळे ऑक्सिजनची उपलब्धता व उपचार घेणारे यांचा मेळ बसत नाही. त्यामुळे १५ दिवस कडक लॉकडाऊन जाहीर केले, तर कोरोना रुग्णांची संख्या घटेल, अशी भूमिका त्यांनी मांडली.
यावेळी काही व्यापा-यांनी दोन दिवस लॉकडाऊन करावे, अशी मागणी केली होती. परंतु, सर्वच राजकीय पदाधिकारी व काही व्यापा-यांनी १० दिवसांचे लॉकडाऊन करण्यात यावे, अशी मागणी लावून धरली. यामुळे प्रशासनाने १० ते २० मे पर्यंत कडक लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.
---
दूध, भाजीपाल्याची फिरून विक्री
मेडिकल, दवाखाने दिवसभर सुरू राहतील. कृषी सेवा केंद्र व किराणा दुकानांसाठी बाहेरगावाहून माल घेऊन येणाऱ्या वाहनांना माल उतरवून देण्यासाठी सवलत देण्यात आली आहे. याशिवाय दूध, भाजीपाला विक्री एका जागेवर न करता सकाळी ११ वाजेपर्यंत फिरून विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे, असे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी सांगितले.