घारगाव : आंबी खालसा (ता.संगमनेर) येथे एकाच रात्री दहा ठिकाणी घरफोड्या केल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. या घटनेत ऐवज चोरीस गेल्याची चर्चा असून मात्र निश्चित आकडेवारी समजू शकली नाही.याबाबत मिळालेली माहिती अशी आंबी खालसा येथील गावठाण परिसरातील सादिक नासिर पठाण, बानूबी महंमद सय्यद, शांताराम रामभाऊ घाटकर, दशरथ हरिभाऊ घाटकर, बाळासाहेब सन्तु कदम, शशिकांत दादू कदम, माणिकराव ढमढेरे, दादापाटील ढमढेरे, बबन ढमढेरे, मच्छिंद्र भागूजी कहाणे यांची घरे बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधून कडी, कोंडा उचकून सोमवारी मध्यरात्रीनंतर घरफोड्या केल्या. दरम्यान मंगळवारी सकाळच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. याबाबत आजूबाजूच्या नागरिकांना साधी कुणकुणही न लागल्याने चोरटे सराईत असल्याचे अंदाज व्यक्त होत आहे. या घटनेत रोख रक्कम व सोन्याचा ऐवज चोरीस गेल्याची चर्चा आहे. घारगाव पोलिसांनी घटनास्थळी येत घटनेची माहिती घेतली आहे. तातडीने तपास करावा, अशी मागणी उपसरपंच सुरेश कान्होरे, राष्ट्रवादी चे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब ढोले, सजेर्राव ढमढेरे, संतोष घाटकर, अविनाश भोर, सोमनाथ ढमढेरे, माणिकराव ढमढेरे, बाबासाहेब कान्होरे यांनी केली आहे.