पाथर्डी : सकल मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला आज पाथर्डीत शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. व्यवसायिकांनी दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली. शाळा, महाविद्यालये सुध्दा पूर्णपणे बंद होती.शहराजवळील तनपूरवाडी येथे टायर जाळण्यात आले. जळत असलेले टायर विझविण्यासाठी आलेल्या अग्नीशामकदलाच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळीच पाथर्डी शहरातल्या नाईक चौकात ठिय्या दिला.शहरात येणारे चारही बाजूंचे रस्ते बंद असल्याने ग्रामीण भागातील माणूस शहरात आलाच नाही. बस पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे.सकाळपासूनच मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने चौकात जमले होते. मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात मुस्लीम बांधवही सहभागी झाले होते. तालुक्यातील कोरडगांव, साकेगांव, डांगेवाडी, तनपूरवाडी येथे आंदोलन करण्यात आले. रस्त्यावर लाकडाचे ओंडके आडवे टाकून रस्ता बंद करण्यात आला. काही ठिकाणी टायर जाळण्यात आले. तरूण कार्यकर्ते घोषणा देत मोटारसायकलवर फिरत असल्याचे चित्र शहरात पहावयास मिळाले. तालुक्यातील निवडूंगे येथे रस्त्यावरच भजन आंदोलन करण्यात आले. शहरातील प्रत्येक चौकाचौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तालुक्यातील बहुतांशी गावात आज आंदोलन करण्यात येवून बंद पाळण्यात आला. पाथर्डी शहर व तालुक्यात बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.
पाथर्डीत तालुक्यात बंदला १०० टक्के प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 12:25 PM