अरुण वाघमोडे / अहमदनगर: अवतार मेहेरबाबा हे ४ मे १९२३ रोजी नगर शहराजवळील आरणगाव येथे आले हाेते. या घटनेला आता १०० पूर्ण होत असून यानिमित्त ४ व ५ मे रोजी विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे मेहेरबाबा ट्रस्टचे विश्वस्त डॉ. मेहेरनाथ कलचुरी यांनी सांगितले.
डॉ. कलचुरी यांनी सांगितले की, नगरमधील खुशरु क्वार्टरमधून अवतार मेहेरबाबा आपल्या निवडक शिष्यांबरोबर अरणगाव येथे पायी गेले. तेथे ते प्रथम लिंबाच्या झाडाखाली थांबले होते. अरणगावमधील हे ठिकाण खुशरु इराणी व गुलुमाई इराणी यांच्या मालकीचे होते. त्यावेळी याला मेहेराबाद नव्हे तर अरणगाव असे म्हणत कारण ते जवळच्या गावाचे नाव होते. त्यानंतर या ठिकाणाला बाबांनी मेहेराबाद असे नाव दिले. बाबा येण्यापूर्वी पहिल्या महायुद्धात (१९१४ ते १९१८) हा भाग ब्रिटिश लष्करी तळ म्हणून वापरला जात होता.
युद्धानंतर जमीन आणि इमारतींचा लिलाव झाला आणि ही मालमत्ता इराणी कुटुंबियांनी विकत घेतली. या ठिकाणी बाबांचे आगमन झाल्यानंतर त्यांनी येथील रेल्वे लाइन शेजारी असणारे ब्रिटिशकालीन पोस्ट ऑफिस, मेसक्वार्टरची दुरुस्ती करून स्वच्छ करून राहण्यायोग्य बनविले. याठिकाणी बाबा ४ ते २५ मे पर्यंत प्रथम राहिले व २५ मे ला येथे त्यानी मेहराबादचा बोर्ड लावला तेव्हापासून या ठिकाण प्रसिद्ध झाले. मेहेराबाद येथे ४ व ५ मे रोजी स्वागत, भजन, पदयात्रा, प्रवचन, व्याखान, महितीपट आदी कार्यक्रम होणार आहेत. या सोहळ्याला देश-विदेशातून भाविक येणार असल्याचे डाू. कलचुरी यांनी सांगितले.