अहमदनगर: सावत वेतन आयोग करावा, सफाई कामगारांना वारसा हक्क लागू करावा, यासह इतर मांगण्यांसाठी सोमवारी गांधी जयंतीदिनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नगर ते मंत्रालय असा लाँग मार्च काढला आहे. शहरातील सिद्धार्थनगर येथून सकाळी १० वाजता या लाँग मार्चला प्रारंभ झाला. १ हजार पेक्षा जास्त कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
सकाळी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून लाँग मार्चला प्रारंभ झाला. त्यानंतर माळीवाडा येथील महात्मा फुले पुतळा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, महात्मा गांधी पुतळा व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कल्याण रोड मार्गे लाँग मार्च पुढे गेला. यावेळी सहभागी कर्मचाऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी केली. दररोज २० किलोमीटर अंतर चालवून कर्मचारी रस्त्यातील गावात मुक्काम करणार आहेत. दरम्यान या लाँग मार्चमध्ये सफाई कर्मचारी, लिपिक व काही अधिकारीही सभागी झाले आहेत. त्यामुळे मनपाचे कामकाज ठप्प झाले आहे. सोमवारी शहरात सफाई न झाल्याने बहुतांशी ठिकाणी घाण साचली होती. मनपा कामगार संघटनेचे अध्यक्ष कॉ. अनंत लोखंडे, सरचिटणीस आनंद वायकर हे आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत.