----------------
१९२० मध्ये लोकमान्य टिळकांचे निधन झाले आणि देशात गांधीयुग सुरू झाले. देशभर गांधीजींविषयी प्रचंड औत्सुक्य होते. लोक त्यांच्या सभांना मोठी गर्दी करायचे. संगमनेरलाही स्वातंत्र्य चळवळ जोमात सुरू होती. असहकाराची चळवळ जोर धरीत होती. त्याचवेळी महात्मा गांधींनी टिळक स्वराज्य फंडाची घोषणा केली होती. गावोगावी यासाठी ते निधी संकलित करीत होते. लोकांना स्वदेशी कपडे, स्वदेशी वस्तूंच्या वापराचे आवाहन करीत होते.
संगमनेरातल्या काकासाहेब पिंगळे, बापूसाहेब पारेगावकर, तुकाराम निऱ्हाळी, गंगाधर दळवी, मुरलीधर जयरामदास मालपाणी, जगन्नाथ दळवी, गणेश सखाराम सराफ, लालसाहेब पीरजादे, शिवनारायण नावंदर, बाबूराव ठाकूर, शंकरराव संतवकील आदी पुढारी मंडळींनी महात्मा गांधींना संगमनेरला येण्याचे निमंत्रण दिले. गांधीजींनी ते स्वीकारले. खुद्द गांधीजी संगमनेरला येणार म्हणून संगमनेरसह आसपासच्या गावात चैतन्य पसरले.
२१ मे १९२१ रोजी भुसावळची सभा संपवून गांधीजी संध्याकाळी नाशिकला आले आणि तिथून थेट ते संगमनेरला आले. सोबत महादेवभाई देसाई हेदेखील होते. आज त्यावेळचा इतिहास वाचताना आश्चर्य वाटते, गांधीजींची मुक्कामाची व्यवस्था सोमेश्वर मंदिरात करण्यात आली होती. यामागचे नेमके कारण कळायला आज तरी मार्ग नाही. मात्र, गांधीजींचाच कुणाच्याही घरी थांबण्याला विरोध असावा म्हणून अशी सोय करण्यात आली आली असावी. गांधीजी मंदिरात थांबले. मंदिरात काही देवतांच्या छोट्या मूर्ती होत्या. त्यातील एका मूर्तीच्या अंगावर अतिशय सुंदर असे कपडे होते; पण ते विदेशी कापडाचे होते, हे बघून गांधीजींना वाईट वाटले. त्यांनी मंदिरातून मुक्काम हलवण्याचे जाहीर केले. त्यांनी मंदिरातील मुक्काम हलवला, यामागे दुसरे असेही कारण सांगितले जाते की, इतर सर्वधर्मीय मंडळींना भेटता यावे म्हणूनही त्यांनी मुक्कामाची जागा बदलण्याचे ठरवले. त्या रात्री ते वीरचंद श्रीचंद गुजराथी यांच्या घरी मुक्कामाला थांबले. ती जागा म्हणजे संगमनेरचा सध्याचा गांधी चौक. गांधीजींना बकरीचे दूध हवे होते. म्हणून मूळच्या जोर्व्याच्या असलेल्या; परंतु संगमनेरात वास्तव्याला असणाऱ्या सीताबाई काकड यांच्याकडून हे दूध आणण्यात आले.
दुसऱ्या दिवशी म्हणजे २२ मे रोजी नगरपालिकेच्या प्रांगणात गांधीजींच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. संगमनेरबरोबरच आसपासच्या गावांतूनही मोठ्या संख्येने लोक या सभेसाठी उपस्थित होते. या सभेत चार हजार रुपयांचा निधी जमा झाला. विशेष कौतुकाची ठरलेली गोष्ट म्हणजे गांधीजींनी सभेत लोकांना टिळक स्वराज्य फंडासाठी देणगी देण्याचे आवाहन केल्यावर सभेसाठी उपस्थित असलेल्या एक गृहिणी द्वारकाबाई मोहनीराज देशपांडे यांनी आपल्या हातातील सोन्याची एक पाटली गांधीजींकडे सुपूर्द केली. १९२१ साली स्त्रियांना सासुरवाशीण म्हणून संबोधले जायचे, अशा काळात संगमनेरला एका जाहीर सभेला महिलांनी येणे आणि या सभेत घरचे काय म्हणतील याची पर्वा न करता हातातील सोन्याची पाटली काढून देणे, ही खूप धाडसाची गोष्ट होती, असेच म्हणावे लागेल.
याच सभेत संगमनेर शहरातील नागरिकांच्या वतीने गांधीजींना तांब्याच्या पत्र्यावर कोरलेले मानपत्र देण्यात आले. या मानपत्रावर पुढील मजकूर कोरलेला आहे,
‘पूज्य महात्मा गांधी यांना मानपत्र
परमपूज्य महात्मा श्री. गांधीजी महाराज,
आमच्या या संगमनेर शहरास आपले पवित्र दर्शनाचा लाभ होण्याचे या शुभप्रसंगी, आम्ही संगमनेरचे रहिवासी आपले अत्यंत अंत:करणपूर्वक स्वागत करण्याकरता व आपण जी अमोलिक देशसेवा करीत आहात त्याबद्दल आदर, कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता या ठिकाणी जमलो आहोत.
आपल्या दर्शनाने व उपदेशाने आपण ज्या महत राष्ट्रकार्याचे सर्वमान्य पुरस्कर्ते आहात. ते राष्ट्रकार्य साधनेकरिता आपण घालून दिलेला धडा मन:पूर्वक गिरविण्याचे व भरत खंडाच्या उद्धारार्थ सत्य व अहिंसा या मार्गाचे अवलंबन करण्याचे आमच्यात सामर्थ्य येवो, अशी त्या जगन्नियंत्या परमेश्वराजवळ आमची प्रार्थना आहे.’
या मानपत्रावर नागरिकांतर्फे असा उल्लेख करून शहरातील विविध समाजाच्या पाच मान्यवरांची नावे कोरलेली आहेत यात, लालसाहेब पिरजादे, गणेश सखाराम सराफ, बाबूराव अण्णाजी ठाकूर, शिवनारायण शाळीग्राम नावंदर व तुकाराम बाळाजी निऱ्हाळी यांची नावे आहेत. हे मानपत्र गांधीजींनी त्यांची आठवण म्हणून पुन्हा नगरपालिकेकडे सुपूर्द केले. महादेव शंकर शिंदे नावाच्या कारागिराने तांब्याच्या पत्र्यावर कोरलेले हे मानपत्र सध्या नगरपालिकेकडे उपलब्ध आहे. या सभेनंतर महात्मा गांधी कोपरगाव मार्गे येवला येथे सभेसाठी रवाना झाले. संगमनेरच्या सभेचा वृत्तांत ९ जून १९२१ च्या नवजीवन या नियतकालिकात प्रसिद्ध झाला होता. गांधीजींच्या या ऐतिहासिक सभेला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने ही आठवण.
-डॉ. संतोष खेडलेकर, संगमनेर
(लेखक हे संगमनेर इतिहास संशोधन मंडळाचे कार्याध्यक्ष)