सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री देवराई सामाजिक संस्थेच्या वतीने सायखिंडी येथील डोंगर पायथ्याशी चार वर्षांपूर्वी विविध प्रकारच्या २६ हजार झाडांची रोपे लावण्यात आली होती. या रोपांची वाढ होऊन त्यांचे रुपांतर झाडांमध्ये झाले आहे. हा परिसर हिरवाईने बहरला आहे. याच ठिकाणी सह्याद्री देवराई संस्थेचे सदस्य आणि अहमदनगर जिल्हा परिषदेचे सदस्य सीताराम राऊत यांनी वट पौर्णिमेनिमित्त अनोखा उपक्रम हाती घेतला. राऊत यांनी आंध प्रदेशातून साधारण १५ फुट उंचीची तीन ते चार वर्षे वयाची वडाची १०१ झाडे आणली.
वट पौर्णिमेचे औचित्य साधत त्यांनी डोंगर पायथ्याशी १०१ जोडप्यांच्या हस्ते वडाच्या झाडांचे रोपण करून घेतले. प्रत्येक झाडाला रोपण करणाऱ्या जोडप्याचे नाव देण्यात आले आहे. दरवर्षी वट पौर्णिमेला एकाच वडाच्या झाडाची अनेक महिला पूजा करतात. मात्र, आम्ही हक्काचे वडाचे झाड लावले आहे. पतीसोबत झाडाची पूजा करत फेऱ्यादेखील घेतल्या. त्यामुळे या झाडाचे संवर्धन करत इथून पुढे प्रत्येक वट पौर्णिमेला आम्ही लावलेल्या झाडाची पूजा करायला येथे येणार असल्याचे महिलांनी ‘लोकमत’ला सांगितले. जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत, मुंबई येथील ह. भ. प. जगन्नाथ महाराज पाटील, राष्ट्र सेवा दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजाभाऊ अवसक, ज्येष्ठ रंगकर्मी वसंत बंदावणे, ह. भ. प. रोहिदास बर्गे, घुलेवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य हरिभाऊ ढमाले, चंद्रकांत वाकचौरे, रवींद्र गिरी आदी यावेळी उपस्थित होते.
------------------
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाला प्राणवायूचे महत्व समजले आहे. त्यामुळे वृक्षारोपण ही काळाजी गरज बनली आहे. सण, उत्सवात पर्यावरणाची सांगड घालत १०१ जोडप्यांच्या हस्ते १५ फुट उंचीच्या व तीन ते चार वर्षे वयाच्या वडाच्या झाडांचे रोपण करण्यात आले. भविष्यातही असेच पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेणार आहे.
- सीताराम राऊत, जिल्हा परिषद सदस्य, अहमदनगर.
..............
फोटो नेम : २४ सह्याद्री देवराई, संगमनेर
ओळ : सह्याद्री देवराई संस्थेच्या वतीने डोंगराच्या पायथ्याशी वडाच्या झाडांचे रोपण करण्यात आले.