अहमदनगर : नगर शहरात सध्या काविळीची साथ सुरू आहे. या ठिकाणी शेकडो नागरिकांना काविळीची लागण झालेली असतांना आॅगस्ट महिन्यात जिल्ह्यात १०७ गावात पिण्याचे पाणी शुध्दीकरणात अनियमितता झालेली आहे. पाणी शुध्दीकरणासाठी ब्लिचिंग पावडर असतांनाही जिल्ह्यात १२ गावात पिण्याचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिला आहे. तसेच प्रत्येक महिन्यांप्रमाणे आॅगस्टमध्ये २५८ गावातील पाणी नमुने दूषित आढळले आहेत.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग, स्वच्छता आणि पाणी गुणनियंत्रण समितीच्या वतीने दर महिन्याला जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचे नमुने घेण्यात येतात. या ठिकाणी पाणी नमुने पिण्यास अयोग्य आणि पाणी शुध्दीकरणात अनियमितता, दूषित असणाऱ्यांना गावच्या ग्रामपंचायतींना लाल कार्ड देण्यात येत आहे. मात्र, असे असतांनाही जिल्ह्यातील दूषित पाणी नमुने सापडण्याचे प्रमाण अद्यापही घटलेले दिसत नाही.आरोग्य विभागाने आॅगस्ट महिन्यात १ हजार ३१६ ग्रामपंचायतींत पिण्याचे पाणी योग्य आहे की नाही याची तपासणी करण्यात आली. यात तीन गावात पाणी शुध्दीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या ब्लिचिंग पावडरचा साठा नसल्याचे आढळून आले. १२ गावात पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे आढळून आले. तर १०७ गावात पाणी शुध्दीकरणात अनियमितता दिसून आली. करंडी, शिवाजीनगर (ता. अकोले), रुपेवाडी (पाथर्डी) या ठिकाणी टीसीएल पावडर नव्हती. (प्रतिनिधी)दरम्यान, पाण्याच्या जैविक तपासणीत २५८ पाणी नमुने दूषित आढळलेले आहेत. यात सर्वाधिक ६४ नमुने एकट्या श्रीगोंंदा तालुक्यातील आहेत. त्या खालोखाल अकोले ३६, संगमनेर २३, नगर २०, कोपरगाव आणि पाथर्डी प्रत्येकी १९, कर्जत १६, पारनेर १५, राहुरी ८, श्रीरामपूर ७, राहाता ६ यांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १० हजार ४५९ पाणी तपासण्यात आले असून यात १ हजार ८७८ पाणी नमुने दूषित आढलेले आहेत. पाणी शुध्दीकरणात अनियमितता असणारी गावेअकोले ३१, जामखेड २५, नेवासा १४, पारनेर २, पाथर्डी २५, राहुरी ६, संगमनेर ४ यांचा समावेश आहे. श्रीरामपूर, श्रीगोंदा, शेवगाव, राहाता , नेवासा, कर्जत आणि नगर तालुक्यातील एकाही गावाचा समावेश यात नाही.जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणि जिल्हा पाणी गुणवत्ता समितीच्या मार्फत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पिण्याचे शुध्द पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे नमुने दूषित येत आहेत. याबाबत संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यात जलजन्य आजारांचा उद्रेक होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे.- शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी.
१०७ गावात पाणी शुध्दीकरणात अनियमितता
By admin | Published: September 11, 2014 11:16 PM