अहमदनगर : जिल्ह्यात साडेतीन हजार जिल्हा परिषद शाळा असून मुख्याध्यापकांची ४५७ पदे मंजूर आहेत. यातील ३४२ पदे कार्यरत असून ११६ पदे रिक्त आहेत. मागील वर्षी फेब्रुवारी २०२२ मध्ये शिक्षकांची पदोन्नती होऊन मुख्याध्यापकांची १६९ पदे भरली गेली. परंतु अजूनही ११६ पदे रिक्त आहेत. आता पुढील महिन्यात मे अखेर या पदोन्नती होणार असून त्यात किती शिक्षक पदोन्नती स्वीकारतात, याकडे सर्वांचेच लक्ष असेल.
सेवाज्येष्ठतेनुसार शिक्षकांना मुख्याध्यापकपदी पदोन्नती मिळते. परंतु अनेकदा पन्नाशी ओलांडलेले शिक्षक मुख्याध्यापकपदाची जबाबदारी घेण्यास टाळाटाळ करतात. बारा वर्षे सेवा झाल्यानंतर शिक्षकाची वेतनश्रेणी व मुख्याध्यापकाची वेतनश्रेणी जवळजवळ सारखीच असते. त्यामुळे पगारासाठी नव्हे तर केवळ पदासाठी काही शिक्षक मुख्याध्यापक होण्याला पसंती देतात. परंतु बदलीच्या वेळी प्रत्यक्ष समुपदेशनाच्या वेळी सोयीचे ठिकाण मिळाले नाही तर बहुदा शिक्षकांकडून पदोन्नती नाकारली जाते. हे प्रमाण अनेकदा ५० टक्क्यांपर्यंतही जाते.
तालुकानिहाय रिक्त पदे अशी -अकोले- १०, संगमनेर ६, कोपरगाव ९, राहाता ५, श्रीरामपूर ५, राहुरी ११, नेवासा ८, शेवगाव १०, पाथर्डी ६, जामखेड ५, कर्जत ६, श्रीगोंदा ८, पारनेर १०, नगर १७