लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्यात गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने चांगली हजेरी लावली आहे. सध्या मराठवाड्यातील धरणांमध्ये ११.८७ टक्के पाणीसाठा आहे. गत महिन्यात १५ टक्के जलसाठा होता. महिनाभरात ४ टक्क्यांनी पाणी घटले आहे. अनेक जलप्रकल्पांनी तळ गाठल्याने आगामी कालावधीतही चांगल्या, सातत्यपूर्ण, सर्वदूर पावसाची गरज आहे, अन्यथा काही गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.एकीकडे लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड जिल्ह्यांत पावसाने चांगली हजेरी लावली आहे, तर दुसरीकडे औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांत अद्यापही पावसाला सुरुवात नाही. मराठवाड्यातील जलप्रकल्पांतील पाणीसाठ्याची परिस्थिती पाहता आगामी कालावधीत दमदार पावसाची आवश्यकता आहे.गतवर्षी म्हणजे ११ जून २०१७ रोजी मराठवाड्यातील धरणांत १३.६० टक्के पाणीसाठा होता. यावर्षी हा पाणीसाठा ११.८७ टक्के इतका आहे. दैनंदिन पाण्याचा वापर होत असल्याने सध्या जायकवाडीतील पाणीसाठ्यात घट होत असल्याचे चित्र आहे. जायकवाडीमध्ये ५ जून रोजी १२६६.१०२ दशलक्ष घनमीटर म्हणजे २४.३२ टक्के पाणीसाठा होता. ११ जून रोजी हाच पाणीसाठा १२४६.४२ (२३.४१) टक्क्यांवर आला. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुरेसा पाऊस झाल्यानंतरच जलसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात होईल. जायकवाडीसह मराठवाड्यातील इतर जलप्रकल्पांचीही अशीच काहीशी अवस्था आहे. नांदेड येथील विष्णुपुरी जलाशयात २९.८२ टक्के पाणीसाठा उरला आहे.गेल्या दोन वर्षांपासून मांजरा धरणाच्या क्षेत्रात चांगला पाऊस झाला. त्यामुळे दोन्ही वर्षे हे धरण पाण्याने शंभर टक्के भरून वाहिले. त्यामुळे टंचाई भासली नाही. पिण्याच्या पाण्याची मोठी सोय झाली.सध्या मात्र या धरणात ८.२३ टक्के जलसाठा आहे. या धरणाच्या पाण्यावर सिंचनाचे क्षेत्रही मोठे आहे. त्यामुळे मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.अन्य जलप्रकल्पांतील पाणीसाठानिम्न दुधना प्रकल्पात १४०.८९ दलघमी (१५.८१ टक्के), येलदरी प्रकल्पात ११८.०७ दलघमी, सिद्धेश्वर प्रकल्पात १४१.१६ दलघमी, माजलगाव धरणात १५३.६० दलघमी (३.७२ टक्के), मांजरा धरणात ६२.०० दलघमी (८.२३ टक्के), निम्न मनार प्रकल्पात १४.९६ दलघमी (४.५२ टक्के), निम्न तेरणा प्रकल्पात ७२.३५ दलघमी (४६.४६ टक्के), विष्णुपुरी धरणात २६.८५ दलघमी (२९.८२ टक्के), सिना कोळेगाव प्रकल्पात ७४.७० दलघमी (०.५३ टक्के) पाणी साठा आहे.
मराठवाड्यातील धरणांत ११.८७ टक्के पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 12:34 AM
मराठवाड्यात गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने चांगली हजेरी लावली आहे. सध्या मराठवाड्यातील धरणांमध्ये ११.८७ टक्के पाणीसाठा आहे. गत महिन्यात १५ टक्के जलसाठा होता.
ठळक मुद्देचांगल्या पावसाची प्रतीक्षा : जायकवाडीत २३.४१, विष्णुपुरीत २९.८२, तर मांजरा धरणात ८.२३% जलसाठा