अहमदनगर : नोटाबंदीनंतर मोठ्या मिनतवारीनंतर रिझर्व्ह बँकेने अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ३५० कोटी रुपये स्वीकारले आहेत. पण अजूनही १२ कोटी रुपयांची रकम रिझर्व्ह बँकेकडून स्वीकारली जात नसल्याने बँकेतच पडून आहे.त्यामुळे ३५० कोटी रुपयांचा हत्ती गेला असला तरी १२ कोटी रुपयांचे शेपूट अडकून पडले आहे. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी देशात नोटाबंदी लागू करण्यात आली. या एकाच दिवशी अहमदनगर जिल्हा बँकेच्या वेगवेगळ्या शाखांमधून जमा झालेल्या भरणा रकमेचे हे १२ कोटी रूपये आहेत. नोटाबंदी झाल्यानंतर राज्यातील सर्वच जिल्हा सहकारी बँकांकडील जुन्या पाचशे व एक हजार रूपयांच्या नोटा स्वीकारण्यास रिझर्व्ह बँकेने नकार दिला होता. याबाबत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील सहकारी बँकांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय अर्थमंत्री तसेच रिझर्व्ह बँकेच्या अधिकाºयांची भेट घेऊन जुन्या नोटांचा प्रश्न त्यांच्यासमोर मांडला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने जिल्हा बँकांकडील जुन्या नोटा रिझर्व्ह बँकेकडून स्वीकारण्यात आल्या. पण नोटाबंदी झालेल्या दिवशी म्हणजे ८ नोव्हेंबरला जिल्हा बँकांकडे जमा झालेल्या नोटा अजूनही रिझर्व्ह बँकेने स्वीकारलेल्या नाहीत. त्यामुळे एकट्या अहमदनगर जिल्हा बँकेची १२ कोटी रुपयांची रक्कम अडकून पडली आहे. याबाबत जिल्हा बँकेने रिझर्व्ह बँकेविरोधात न्यायालयात धाव घेऊन या रकमेवरील व्याजाची मागणी केली आहे.
नोटाबंदीपासून नगर जिल्हा बँकेचे १२ कोटी पडून; रिझर्व्ह बँकेकडून नोटा स्वीकारण्यास नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 7:41 PM