संगमनेर : संगमनेर कारागृहातील २२ कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे बुधवारी (२९ जुलै) रॅपिड अँटिजेन तपासणीतून समोर आले. त्यानंतर संगमनेर तालुक्यात कार्यरत असलेल्या १२ पोलीस कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचीही रॅपिड अॅँटिजेन तपासणी केली असता त्यांचे अहवाल शुक्रवारी (३० जुलै) पॉझिटिव्ह आले, अशी माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.
सर्वसामान्य नागरिक , शासकीय अधिकारी, कर्मचारी, कारागृहातील कैदी यांच्यानंतर आता पोलिसांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. २२ कैद्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यानंतर पोलिसांची तपासणी केली असता दुपारी प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालात ३१ व ३९ वर्षीय दोन पुरूष तर २६ व ३१ वर्षीय दोन महिला अशा एकूण चार पोलीस कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली आहे.
शुक्रवारी रात्री प्राप्त अहवालात ८ पोलीस कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात ४५ व ३३ वर्षीय दोन महिला पोलीस तर ३५, ३७, ४२, ५३, ५१, ५० वर्षीय असे सहा पुरूष पोलीस कर्मचारी अशा एकूण आठ जणांचा समावेश आहे. हे पोलीस कर्मचारी संगमनेर तालुका, शहर पोलीस ठाणे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व संगमनेर वाहतूक शाखेतील कर्मचारी आहेत.