संगमनेर : आपण आतापर्यंत गाय, म्हैस यासह आदि प्राण्यांच्या प्रसुती पाहिल्या आहेत. पण एका सर्पमित्राने चक्क अंड्यातून सापाच्या १२ पिल्लांना सुखरुपपणे जीवदान दिले आहे. संगमनेरमधील सचिन गिरी यांनी ६१ दिवस अंड्याची काळजी घेत सापांना जीवदान दिले.
साधारण दोन महिन्यांपुर्वी संगमनेर तालुक्यातील कासारा दुमाला गावातील शेतात विहीरीचे काम सुरु होते. या कामाच्या वेळी शुभम काळे यांना एक धामण जातीचा साप दिसला. त्याच्या शेजारीच काही अंडीही दिसली. काम सुरु असल्याचे साप निघून गेला. हे काम जेसीबीने सुरु असल्याचे एक अंडेही फुटले. त्यानंतर काळे यांनी ही माहिती सर्पमित्र सचिन गिरी यांना दिली. गिरी तात्काळ घटनास्थळी गेले. त्यानंतर चिखलाने खराब झालेली अंडी ताब्यात घेतली. त्यावेळी त्यातून सापांच्या पिल्लांचा जन्म होणे अवघड होते. या अंड्यातून सापाच्या पिल्लांचा जन्म होण्यासाठी प्रयत्न सुरु केले.
अंड्यामधून सापाच्या पिल्लांचा जन्म होण्यास ६१ दिवसांचा कालावधी जाणे आवश्यक असते. गिरी यांनी अंडी घरी नेली. वाळू, राख, पालापाचोळा हे घटक एकत्र करत त्यामध्ये ही १२ अंडी ठेवली. ६१ दिवसांचा कालावधी पूर्ण होत आला होता. मात्र अंड्यावरील कवच टणक झाल्याने पिल्लांना बाहेर येणे अशक्य होते. त्यामुळे हा कालावधी पूर्ण होताच गिरी यांनी चिमट्याच्या साहाय्याने सुरक्षितपणे अंडी फोडून पिल्लांना जीवदान दिले. यादरम्यान गिरी यांनी काळजी घेतल्याने एकही साप दगावला नाही. जन्मानंतर त्यांची काळजी घेतली. जन्मानंतर या १२ पिल्लांना संगमनेर वन विभागाकडे सुपुर्द केल्याची माहिती गिरी यांनी दिली.