लोकमत न्यूज नेटवर्क
संगमनेर : ग्रामीण पर्यावरण व्यवस्थेचा आणि अर्थशास्त्राचा कायापालट करण्यासाठी पाणी फाऊंडेशनच्यावतीने राज्यात ‘सत्यमेव जयते समृद्ध गाव’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात संगमनेर तालुक्यातील १२ गावे पात्र ठरली आहेत. जलसंधारणातून गावात जलसमृद्धी आणण्यासाठी येथील ग्रामस्थ मेहनत घेत आहेत.
राज्यातील ४० तालुक्यांमधील एक हजाराहून अधिक गावांची समृद्ध गाव स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती. कोरोनाच्या परिस्थितीत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण घेत संगमनेर तालुक्यातील मांची, सावरगाव तळ, पेमगिरी, भोजदरी, कुंभारवाडी, खंदरमाळवाडी, पिंपळगाव माथा, पिंपळगाव देपा, मोधळवाडी, खरशिंदे, कणसेवाडी, म्हसवंडी या १२ गावांनी पहिल्या टप्प्यातील काम यशस्वीरित्या पूर्ण केल्याने ही गावे स्पर्धेसाठी पात्र ठरली आहेत. समृद्ध गाव स्पर्धेत प्रामुख्याने जल व्यवस्थापन आणि पर्यावरणाचे आरोग्य सुधारणे या गोष्टींवर भर देण्यात येत आहे. काही गावांमध्ये पाण्याचा भरमसाठ उपसा होऊ लागला. पाण्याचा अनियंत्रित वापर होऊ लागल्याने उन्हाळा सुरू होताच दुष्काळाचे संकट समोर उभे राहते. जलसंधारण करून दुष्काळाचे संकट दूर होणार नाही. याशिवाय हवामान बदलाच्या संकटामुळे शेतीतील अनिश्चितता आणि दुष्काळ या समस्यांनी अधिक उग्र रूप धारण केले आहे. याच समस्यांवर उपाय शोधण्यासाठी आणि दुष्काळाच्या समस्येचा समूळ नाश करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कमी पाण्यात अधिक उत्पन्न घेऊन शेतकऱ्यांना समृद्ध करण्यावर भर देण्यात आला आहे.
पहिल्या टप्प्यात १२० गुणांसाठी काम होणे अपेक्षित होते. संगमनेर तालुक्यातील १२ गावांपैकी ७ गावांनी १२०पैकी १२० गुण मिळवले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अमीर खान, किरण राव यांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने आयोजित कार्यक्रमात संगमनेर तालुक्यातील गावांचा सन्मान करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते या गावांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
------------
पाणी फाऊंडेशनच्यावतीने २०१९मधील ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत संगमनेर तालुक्यातील १०० गावांनी सहभाग घेतला होता. या गावांमध्ये जलसंधारणाची कामे झाली. पाणी फाऊंडेशनच्या सर्व स्पर्धांना ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- राजेंद्र जाधव, संगमनेर तालुका समन्वयक, पाणी फाऊंडेशन
-------------
पाणी फाऊंडेशनच्यावतीने खंदरमाळवाडीत भरीव काम झाले आहे, होत आहे. यासाठी ग्रामस्थांचा मोठा सहभाग मिळतो आहे. समृद्ध गाव स्पर्धेत आमच्या गावाने सहभाग घेतला असून, शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ मिळणार आहे.
- किशोर डोके, सामाजिक कार्यकर्ते, खंदरमाळवाडी