अहमदनगर : सोमवारपासून (दि.२३) राज्यातील नववी ते बारावीपर्यंत शाळा सुरू करण्याबाबतच्या सूचना शासनाने दिल्यानंतर तशी तयारी स्थानिक पातळीवर सुरू झाली असून जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या १२०९ शाळा सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जिल्ह्यात नववी ते बारावीपर्यंत १२०९ शाळा असून त्यात सुमारे २ लाख ८४ हजार विद्यार्थी आहेत. या शाळांमध्ये सुमारे १० हजार शिक्षक व ६ हजार शिक्षकेतर कर्मचारी असा एकूण १६ हजार कर्मचाऱ्यांचा स्टाफ आहे. सोमवारपासून शाळा सुरू करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिल्यानंतर माध्यमिक शिक्षण विभागाने तशी तयारी सुरू केली आहे. प्रथम सर्व शिक्षकांची कोविड चाचणी करण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर शाळा सॅनिटायझेशन, तसेच इतर स्वच्छता शाळांनी आपापल्या पातळीवर सुरू करावी, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.
पालकांचे संमतीपत्र घेऊन शाळा सुरू होणार असल्याने पहिल्या दिवशी किती शाळा सुरू होणार किंवा किती विद्यार्थी शाळेत येणार हे जरी अद्याप अस्पष्ट असले तरी स्थानिक कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन मुख्याध्यापकांनी निर्णय घ्यायचा आहे.
तीन हजार शिक्षकांची चाचणी
एकूण १० हजार शिक्षकांपैकी तीन हजार शिक्षकांची चाचणी पूर्ण झाली असून अद्याप ७ हजार शिक्षकांच्या चाचणीचे आव्हान शिक्षण विभागापुढे आहे. चाचणीचा अहवाल पाहूनच मुख्याध्यापकांनी शिक्षकांना शाळेत प्रवेश द्यायचा आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये शिपायांची आवश्यकता शाळेत पहिल्या दिवशीपासून भासणार आहे. दुसरीकडे शासकीय केंद्रांवर चाचणीसाठी शिक्षकांची गर्दी होत असून कोविड सेंटरवरील नियोजन बिघडल्याचे निदर्शनास येत आहे.