लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : मुद्रांक शुल्कामध्ये ५० टक्के सवलतीच्या शेवटच्या महिन्यात म्हणजे डिसेंबर २०२० मध्ये १२ हजार ८५४ इतके मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले आहेत. त्यापोटी अंदाजे ३० ते ४० कोटींपेक्षा जास्त मुद्रांक शुल्क जमा झाला आहे. मुद्रांक शुल्कामध्ये ५० टक्के सवलत दिल्यापासूनच्या चार महिन्यांत ३८ हजार २१९ इतकी दस्त नोंदणी झाली आहे.
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रांवर मंदीचे सावट असल्याने राज्याची अर्थव्यवस्था कोलमडली होती. ही मरगळ लक्षात घेऊन महसूल विभागाने बांधकाम क्षेत्राला व अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत ६ टक्क्यांऐवजी ३ टक्के मुद्रांक शुल्क आकारणी करण्यात येत होती. त्याचा फायदा ग्राहकांनी घेतला आहे. डिसेंबर हा शेवटचा महिना असल्याने सर्वाधिक १२ हजार ८५४ घरे, जागांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले. त्यातून ३० ते ४० कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले असण्याचा अंदाज व्यक्त झाला आहे. गतवर्षीपेक्षा हे उत्पन्न दुप्पट असल्याने यंदा बांधकाम क्षेत्रातीवरील मरगळ दूर झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
--------------------
अशी झाली दस्त नोंदणी व मुद्रांक शुल्क (रुपये कोटीत)
महिना २०१९ २०२०
दस्त नोंदणी मुद्रांक शुल्क दस्त नोंदणी मुद्रांक शुल्क
सप्टेंबर ६०४३ २८.४७ ८९१९ २२.०९
ऑक्टोबर ५०३२ २०.७९ ६८१५ २५.४४
नोव्हेंबर ७२१४ २५.६६ ७८३१ १८.७६
डिसेंबर ७१३२ २७.६७ १२८५४ ३० ते ४० कोटी
--------------------------
राज्य शासनाने मुद्रांक शुल्कामध्ये ५० टक्के सवलत म्हणजे ६ ऐवजी ३ टक्के मुद्रांक शुल्काची आकारणी केली होती. त्याचा ग्राहकांनी लाभ घेतला आहे. चारही महिन्यांमध्ये गतवर्षीपेक्षा तीन हजारांनी यंदा जास्त दस्त नोंदणी झाली. डिसेंबर-२०१९ च्या तुलनेत डिसेंबर -२०२० मध्ये दस्त नोंदणीची संख्या जवळपास दुपटीने वाढली आहे. किती मुद्रांक शुल्क वसूल झाला, याची कोषागार कार्यालयाकडून अद्याप आकडेवारी प्राप्त झाली नाही. मात्र घर-जागा खरेदी-विक्रीला जिल्ह्यात चालना मिळाली आहे.
-राजेंद्र पाटील, मुद्रांक जिल्हाधिकारी
-----------------
आता दोन टक्के सवलत
मुद्रांक शुल्कामध्ये डिसेंबरपर्यंत ३ टक्के सवलत होती. एक जानेवारीपासून आता त्यात एक टक्का वाढ झाली आहे. म्हणजे आता ६ टक्क्यांऐवजी ४ टक्के मुद्रांक शुल्क आकारणी होईल. ३ टक्क्यांमध्ये वाढलेला एक टक्का म्हणजे मुद्रांक शुल्कात अर्धा टक्का व सेसमध्ये अर्धा टक्का अशी एकूण एक टक्का ही वाढ राहणार आहे. दरम्यान कोरोनाचा लॉकडाऊन असला तरी सवलतीमुळे वार्षिक १६९ कोटीचे उद्दिष्ट गाठण्यात प्रशासनाला यश आले आहे.
--
फोटो -०५ होम