शिर्डी : शिर्डी परिसरातील वीटभट्टीवर काम करणा-या १२५१ मजुरांना बुधवारी (दि.६ मे) साईनगर रेल्वेस्थानकावरूनरेल्वेने उत्तरप्रदेशला स्वगृही रवाना करण्यात आले. घरी जाण्याचा आनंद या मजुरांच्या चेहºयावर स्पष्ट दिसत होता. लॉकडाऊनमुळे येथे अडकलेल्या या साडेबाराशे मजुरांना घेवून बुधवारी दुपारी तीन वाजता ही रेल्वे लखीमपूर (उत्तरप्रदेश) येथे रवाना करण्यात आली. प्रांताधिकारी गोविंद शिंदे, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे, तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, नायब तहसीलदार सचिन म्हस्के, शिक्षण अधिकारी ज्ञानेश्वर वाकचौरे, पोलीस निरीक्षक नितीन गोकावे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले, मिथुन घुगे, रेल्वेचे स्थानकप्रमुख बी़एस़ प्रसाद, पोलीस निरीक्षक रामजी मीना, अनुप देशमुख यांच्यासह शंभरावर कर्मचा-यांनी टाळ्या वाजवत व हात हलवत या सर्वाना निरोप दिला.रेल्वे निघण्यापूर्वी या मजुरांना प्रत्येक बोगीत जावून संस्थानचे सीईओ अरूण डोंगरे यांच्या आदेशानुसार प्रसादालय प्रमुख विष्णू थोरात, भाऊसाहेब थोरात आदींसह प्रसादालय कर्मचा-यांनी अन्नाची पाकिटे दिली. गुरूवारी सायंंकाळी साडेसहा वाजता ही रेल्वे लखीमपुरला पोहचेल. या मजुरांमध्ये ७५२ प्रौढ, ३१४ अर्धे तिकीट काढणारे व १८५ मुले चार वर्षाखालील आहेत. हे सर्वजण येथून जवळच असलेल्या पिंपळवाडी व परिसरातील वीटभट्ट्यांवर काम करणारे आहेत. गेले दोन दिवसांपासून या मजुरांना पाठविण्यासाठी प्रशासनाने रांत्रदिवस काम केले आहे. ग्रामिण रूग्णालयाचे डॉ़संजय गायकवाड, डॉ़ गागरे आदींनी मंगळवारी या सर्वांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना प्रमाणपत्रे दिली. साठ शिक्षकांनी फिरून या मजुरांचा सर्व्हे केला. नियंत्रण कक्षाची स्थापना मजुरांना स्वगृही पाठवण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली व उपजिल्हाधिकारी अर्चना पाटील यांच्या नेतृत्वाखाली नियंत्रण कक्ष काढण्यात आला आहे. यात संदीप नचित, वैशाली आव्हाड, चंद्रशेखर शितोळे आदी कार्यरत आहेत. हे वरिष्ठ अधिकारी रेल्वे निघेपर्यत येथील प्रांताधिकारी गोविंद शिंदे व तहसीलदार कुंदन हिरे यांच्या संपर्कात होते.
साईनगरीतून १२५१ मजूर रेल्वेने उत्तरप्रदेशला रवाना; कर्मचा-यांनी टाळ्या वाजवून दिला निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2020 4:58 PM