चंद्रकांत शेळके, अहमदनगर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा बुधवारपासून (दि. २१) सुरू होत असून, यासाठी ६४ हजार विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. जिल्ह्यात ११० केंद्रांवर परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.
माध्यमिक शिक्षण विभागाने परीक्षेची सर्व तयारी केली आहे. परीक्षेतील गैरप्रकाराला आळा बसावा म्हणून जिल्हास्तरावर ७ भरारी पथके तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय गणित, इंग्रजी या विषयांच्या पेपरला प्रत्येक परीक्षा केंद्रावर गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत बैठे पथक नियुक्त केले जाणार आहे. गणित, इंग्रजी या पेपरच्या दिवशी संवेदनशील केंद्रांवर व्हिडीओ चित्रीकरण केले जाणार आहे. दरम्यान, परीक्षेच्या अनुषंगाने परीक्षा केंद्रावर काॅपी होणार नाही, याची सर्वच यंत्रणांनी खबरदारी घ्यावी. जर केंद्रावर काॅपी झालेली आढळली तर केंद्र संचालकांवर कारवाई करण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ यांनी दिलेले आहेत. उपद्रवी केंद्रांना परीक्षा कालावधीत विशेष करून भेटी देऊन गैरप्रकारांस आळा घालावा, प्रत्येक परीक्षा केंद्रावर तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्या भेटी व्हाव्यात, या पथकाने परीक्षा तणावमुक्त वातावरणात पार पडतील, असे प्रयत्न करावेत, उपस्थित पर्यवेक्षकांमार्फत विद्यार्थ्यांची झडती केंद्रावर घेण्यात यावी, जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर पुरेसा पोलिस बंदोबस्त देण्यात यावा, परीक्षा केंद्रावर इलेक्ट्राॅनिक्स साधनांच्या वापरावर प्रतिबंध करावा, परीक्षा केंद्र परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर पेपरच्या कालावधीत बंद ठेवावेत, परीक्षा केंद्रावरील बैठे पथकाच्या भेटी वाढवाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत.
पहिला पेपर इंग्रजीयंदा बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्चदरम्यान होणार आहे. पहिलाच पेपर इंग्रजीचा असून सकाळी ११ ते २ या वेळेत हा पेपर होईल. या परीक्षेसाठी ६४ हजार ४७ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. तर जिल्ह्यात ११० केंद्रांवर परीक्षेची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण २२ दिवस बारावीची परीक्षा चालणार आहे.
१० मिनिटे वेळ वाढवलाप्रश्नपत्रिकेची पाकिटे ताब्यात घेतल्यापासून प्रश्नपत्रिका वितरित करेपर्यंतचे चित्रीकरण मोबाइलमध्ये करण्यात येणार आहे, तसेच प्रश्नपत्रिकांच्या वाहतुकीवेळी ‘जीपीएस’ प्रणालीचा वापर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वाढवून देण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांनी सकाळच्या सत्रात साडेदहा वाजता, तर दुपारच्या सत्रात अडीच वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहायचे आहे.
१८ संवेदनशील केंद्रजिल्ह्यात १८ संवेदनशील केंद्र घोषित केलेले असून तेथे भरारी पथकांसह इतर यंत्रणेची करडी नजर असेल. त्यात नगर शहरातील दोन, तर इतर १४ केंद्र तालुकास्तरावरील आहेत.
काॅपीमुक्त अभियानाअंतर्गत बारावी परीक्षेची सर्व तयारी झालेली आहे. परीक्षेतील गैरप्रकाराला आळा बसावा म्हणून जिल्हास्तरावर ७ भरारी पथके, बैठे पथके तैनात करण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांनी अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर हजर राहावे.- अशोक कडूस, शिक्षणाधिकारी, माध्यमिक