चंद्रकांत शेळके, अहमदनगर: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे फेब्रुवारी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत यंदा नगर जिल्ह्याचा निकाल ९३.४० टक्के लागला आहे. मागील वर्षीपेक्षा निकालात १.४० टक्के वाढ झाली असून मुलांपेक्षा मुलींचा निकाल अधिक असल्याची परंपरा याहीवर्षी कायम आहे.
मंडळातर्फे बारावीचा निकाल मंगळवारी दुपारी १ वाजता ॲानलाईन जाहीर करण्यात आला. यावर्षी बारावीची परीक्षा ३५ हजार ३५५ मुले व २६ हजार ६११ मुली अशा एकूण ६१ हजार ९६६ विद्यार्थ्यांनी दिली. त्यातून ३२ हजार २०२ मुले (९१.०८ टक्के) व २५ हजार ६७५ मुली (९६.४८ टक्के) असे एकूण ५७ हजार ८७७ विद्यार्थी (९३.४० टक्के) उत्तीर्ण झाले. यंदा पुणे विभागात नगर तिसऱ्या स्थानी फेकले गेले आहे. पुणे विभाग ९५.१९ टक्क्यांसह पहिल्या, तर सोलापूर विभाग ९३.८८ टक्क्यांनिशी दुसऱ्या क्रमांकावर आहे.