संगमनेर : तहसीलदार साहेबराव सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील भरारी पथकाने तीन दिवसात प्रवरा व मुळा नदीपात्रात विविध ७ ठिकाणी छापे टाकून अवैध वाळू वाहतूक करणारी एकूण १३ वाहने पकडली. तहसीलदारांच्या पहिल्याच धडक कारवाईची चर्चा सुरू आहे. तालुक्यात प्रवरा, मुळा, आढळा, म्हाळुंगी या चार नदी पात्रांमधून दररोज विनापरवाना बेसुमार अवैध वाळू उपसा सुरू आहे. महसूल विभागाच्या भरारी पथकाने अनेकदा छापे टाकून वाहने पकडून दंडात्मक कारवाया केल्या. मात्र, वाळू तस्करांचे मोठे जाळे या भागात असल्याने काही केल्या वाळू उपसा बंद होत नाही. नव्याने हजर झालेले तहसीलदार सोनवणे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांनी निवासी नायब तहसीलदार दत्तात्रय जाधव, मंडलाधिकारी अनिल वाणी, दिलीप पवार, तलाठी अनिल कुंदेकर, पोमल तोरणे, सोमनाथ शेरमाळे, थोरात, राऊत, वैद्य व वाहन चालक अशोक मासाळ यांच्या मदतीने गेल्या तीन दिवसात प्रवरा नदीत गंगामाई घाट, निंबाळे, जोर्वे, वाघापूर, रहीमपूर तसेच मुळा नदीत खंदरमाळवाडी व साकूर (मांडवे) परिसरात ७ ठिकाणी छापे टाकून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ११ ट्रॅक्टरसह २ टेम्पो अशी एकूण १३ वाहने पकडली. पकडलेली वाहने घारगाव व शहर पोलीस ठाण्यात लावण्यात आली आहेत. वाहनांमधील वाळू जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे़ तालुक्यातील नदीपात्रासतून सुरू असलेला अवैध वाळूउपसा थांबवावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांधून होत आहे़ या कारवाईमुळे वाळूतस्करांचे धाबे दणाणले आहेत़ (प्रतिनिधी)
वाळूूूची १३ वाहने पकडली
By admin | Published: June 29, 2016 12:41 AM