अहमदनगर : नाशिक जिल्ह्यात धो-धो पाऊस सुरू असल्याने गोदावरी नदीला पूर आला. रात्री उशिराने नदी पात्रातील विसर्ग वाढल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने जिल्ह्यातील नदीकाठच्या चार गावातील १३५ जणांना सुरक्षीत स्थळी हलविले. तसेच कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर आदी नेवासा तालुक्यातील नदी काठच्या गावांना भेटी देऊन नागरिकांना स्थलांतरीत होण्याच्या सूचना तलाठ्यांमार्फत देण्यात आल्या आहेत.नदीकाठाच्या गावांतील ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलविण्याची मोहीम रात्री उशिराने प्रशासनाने हाती घेतली़ कोपरगाव तालुक्यातील मायेगावदेवी- २८, नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम-४७ श्रीरामपूर तालुक्यातील गोवर्धनपूर- २५, नाऊर-३५ जणांना सुरक्षितस्थळी हालविण्यात आले आहे़ याशिवाय नेवासा तालुक्यातील ३५ कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्याची मोहीम नेवासाचे तहसीलदार नामदेव टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होती़ ४डाऊच बुद्रूक शिवारातील डाऊच व कुरण बेट परिसरात भिल्ल आदिवासी समाजातील कुटुंबाची वस्ती आहे. शेती करून या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. सकाळपासून गोदावरीला पाणी वाढू लागताच तहसीलदार प्रशांत खेडेकर, निवासी नायब तहसीलदार शिवाजी सुसरे व तलाठ्यांच्या पथकाने या लोकांना बाहेर येण्याचे आवाहन केले. मात्र कुणीही ऐकले नाही़ सायंकाळी डाऊच व कुरण बेटाला गोदावरीच्या पाण्याने वेढा घातला. त्यामुळे रामदास सावळेराम शाख, लहू सावळेराम शाख, अर्जुन रामदास शाख, अनिल भास्कर शाख, भास्कर रामदास शाख, विष्णू फकीरा मोरे आदींसह एकूण २२ जण या बेटावर अडकून पडले. त्यांना वाचविण्यासाठी खेडेकर यांनी होडी पाठवून मदतीचे प्रयत्न केले. मात्र अंधार पडल्यावर मदत कार्यात अडथळे येत असल्याने प्रशासन हतबल झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता सायंकाळी सात वाजता प्रांताधिकारी कुंदन सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देवून परिस्थितीची पाहणी केली. यावेळी सरपंच कांताबाई दहे आदी उपस्थित होते.
१३५ जण सुरक्षितस्थळी
By admin | Published: August 02, 2016 11:57 PM