जामखेड : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाच्या माध्यमातून उजनी धरणातून जामखेडच्या पाणीपुरवठा योजनेसाठी तब्बल १३८.८४ कोटी रुपयांच्या खर्चास राज्य सरकारने सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामुळे जामखेड शहर व पाच वाड्या, वस्त्यांचा पाणीप्रश्न सुटणार आहे. रखडलेल्या पाणी योजनेसाठी आमदार राेहित पवार यांनी पाठपुरावा केला होता.
जामखेड शहराला भुतवडा तलावातून पाणीपुरवठा होत आहे. दुष्काळी तालुका असल्याने पर्जन्यमान कमी होते. त्यामुळे तलावात पाणी कमी येते. परिणामी आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे शहराला सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातून पाणीपुरवठा व्हावा, यासाठी तत्कालीन पालकमंत्री राम शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर १०८ कोटी रुपये खर्चाचे ढोबळ अंदाजपत्रक तयार करून योजना मंजूर केल्याचे जाहीर केले होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या प्रचारात जामखेडला आले असताना संबंधित योजना मंजूर झाल्याचे पत्र दाखवून त्यांनी निवडणुकीला हवा देण्याचा प्रयत्न केला.
आमदार पवार यांनी निवडून आल्यानंतर या योजनेचा पाठपुरावा करून तांत्रिक मान्यता, सुधारित तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता आणि प्रत्यक्ष निधी मिळवणे ही सर्व कामे केली. मागील शासनाच्या काळात या योजनेचा केलेला प्रकल्प अहवाल हा खासगी कन्सल्टंटमार्फत करण्यात आला होता आणि त्यात अनेक त्रुटी असल्याचे निदर्शनास आले.
जामखेड शहराचा जवळपास ४० टक्के भाग या योजनेतून वगळण्यात आला होता. तसेच अनेक भागांत पूर्ण दाबाने पाणी पोहोचण्याबाबतही प्रश्नचिन्ह होते. ही बाब लक्षात आल्यानंतर आमदार पवार यांनी नाशिकच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता यांच्याकडील यंत्रणेमार्फत नव्याने प्रकल्प अहवाल तयार करून घेतला. पूर्ण दाबाने पाणी मिळेल, अशा प्रकारे आराखडा तयार केला. त्यामुळे या योजनेच्या प्रकल्पाच्या किमतीतही वाढ झाली.
.................
निवडणुकीच्या काळातच जामखेडच्या पाणीप्रश्नाची भीषणता लक्षात आली होती. तसेच हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी येथील अनेक महिला भगिनींनी माझ्याकडे केली होती आणि मीही त्यांना शब्द दिला होता. आज शब्दपूर्ती करताना अत्यंत समाधान वाटत आहे.
- रोहित पवार, आमदार, जामखेड-कर्जत
.............
(फोटो - जामखेड शहराच्या सुधारित पाणी योजनेच्या १३९ कोटी रुपये खर्चास मान्यतापत्र नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे व पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आ. रोहित पवार यांनी स्वीकारले.)