अहमदनगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे दुधाच्या मागणीत घट झाल्याने जिल्ह्यातील १४ लाख लिटर दूध भुकटी तयार करण्यासाठी पाठविले जात आहे. दुधाच्या मागणीत घट झाल्याने दरात ३ ते ५ रुपयांची घट झाली आहे. त्याचा फटका जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत दुधाच्या मागणीत प्रचंड घट झाली होती. कोरोनाची लाट ओसरत असतानाच कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. जिल्ह्यातील संकलित होणारे दूध मुंबई, पुणे, कल्याण, औरंगाबाद आदी जिल्ह्यांत पाठविले जाते; परंतु कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने ही शहरे सध्या बंद आहेत. त्यामुळे या शहरांना पाठविल्या जाणाऱ्या दुधाची मागणी घटली आहे. जिल्ह्यात दररोज २९ लाख लिटर दुधाचे संकलन होते. दुधाची मागणी घटल्याने यापैकी निम्मे म्हणजे १५ लाख लिटर दूध भुकटी तयार करण्यासाठी पाठविले जात आहे; परंतु दूध पावडरची मागणीही घटली असून, प्रतिकिलो २२० रुपये या दराने पावडर विकली जात आहे. त्यामुळे भुकटीसाठी प्रतिलिटर २७ ते २८ रुपयांनी दूध खरेदी करण्यात येत आहे.
...
असे दूध संकलन
सहकारी -७ लाख लिटर
खाजगी- २२ लाख लिटर
....
सहकारी दूध संकलन केंद्र-१५
खाजगी दूध संकलन केंद्र-३००
....
दुधाच्या मागणीत ३० टक्के घट
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्याने दुग्धजन्य पदार्थांची मागणी घटली आहे. उन्हाळ्यात दुग्धजन्य पदार्थांना चांगली मागणी असते. त्यामुळे दुधाला चांगला भाव मिळतो; परंतु मागील उन्हाळ्यात लॉकडाऊन होते. चालूवर्षीही उन्हाळ्यातच लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे याही वर्षी दुधाच्या मागणीत ३० टक्के घट झाली असून, दुधाच्या मागणीत आणखी घट होण्याची शक्यता आहे.
....
प्रतिपूर्ती योजना गुंडाळली
शासनाने दुधाचे भाव पडल्याने प्रति लिटर ५ रुपये याप्रमाणे दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिपूर्ती दिली जात होती; परंतु ही योजनाही सरकारने गुंडाळली असून, दूध उत्पादकांना आर्थिक मदत देण्याची मागणी पुढे येत आहे.
...
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे दुधाच्या मागणीत २५ ते ३० टक्के इतकी घट झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील निम्मे म्हणजे १४ लाख लिटर दूध भुकटीसाठी पाठविले जात आहे.
- योगेश नागरे, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी.