राहुरी : एकीकडे कोरोनाची लढाई प्रशासन लढत आहे. दुसरीकडे मात्र क्वारंटाईन केलेल्या दोन कुटुंबातील तब्बल १४ सदस्यांनी धूम ठोकल्याची घटना राहुरी तालुक्यात उघडकीस आली आहे. यात बीड जिल्ह्यातील एका कुटुंबाचा समावेश आहे. राहुरी तालुक्यात दोन ठिकाणी या घडल्या आहेत. दोन्ही घटना मंगळवारी (दि.१९ मे) सकाळी उघडकीस आल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली आहे. तालुक्यातील केंदळ खुर्द येथे क्वारंटाईन केलेले एक जोडपे दुस-याची मोटारसायकल घेऊन आपल्या दोन लहान मुलामुलींसह पळून गेले आहे. तर दुसºया घटनेत संत गाडगेबाबा आश्रमात क्वारंटाईन केलेल्या बीडच्या एका कुटुंबाने धूम ठोकली. दोन्ही घटनेप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.१५ मे रोजी केंदळ खुर्द येथील सेंट जोसेफ विद्यालय येथील शाळेत काही जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यात एका आदिवासी जोडप्याचा समावेश होता. ते जोडपे आपल्या दोन मुलांसह आले होते. हे क्वारंटाईन केलेले जोडपे दोन मुलामुलींसह अचानक गायब झाले. मित्रांची मोटरसायकल घेऊन ते पळून गेले असल्याचे तेथे ड्युटीवर असलेल्या शिक्षकांच्या लक्षात आले. त्यांनी सदर घटना गाव समितीला तत्काळ सांगितली. बीड जिल्ह्यातून आलेले एक कुटुंब राहुरी येथे संत गाडगे महाराज आश्रम शाळेत १७ मे रोजी क्वारंटाईन करण्यात आले होते. सदर कुटुंबात आठ ते दहा सदस्य होते. ते कुटुंब मंगळवारी रात्री कोणाची पूर्व परवानगी न घेता निघून गेली. राहुरी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यात १४ महिन्यांची लहान मुले देखील होती.‘त्या’ दोन कुटुंबांचा शोध सुरू बाहेरगावावरून कोणी आल्यास त्याची प्रशासनाकडून तसेच गावपातळीवर योग्य ती दखल घेतली जाते. त्यांना क्वारंटाईन केले जाते. त्यांची सर्व व्यवस्था केली जाते. असे असताना हे नवीन जोडपे पळून गेलेच कसे? असा सवाल नागरिकातून विचारला जात आहे. सदर जोडपे कुठे गेले? याबाबत शोधाशोध करण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र बुधवारी सकाळपर्यंत या जोडप्यांचा थांगपत्ता लागला नाही, असे सांगण्यात आले. तहसीलदार फसिउद्दीन शेख यांनी याबाबत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्यानंतर पोलिसांनी या जोडप्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी दिली.
राहुरीतून क्वारंटाईन केलेल्या १४ जणांनी ठोकली धूम; गुन्हा दाखल : बीड जिल्ह्यातील एका कुटुंबाचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 1:24 PM