कर्जत/मिरजगाव : कर्जत तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केलेल्या ४२ उमेदवारांपैकी २१ जणांनी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी २१ जणांनी अर्ज मागे घेतल्याने १४ जागांसाठी १४ आॅगस्टला मतदान होणार आहे. उमेदवारी मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी अनेक इच्छुकांना नेत्यांच्या आदेशासमोर मुकावे लागले. सेवा सहकारी संस्था मतदार संघातून तेरा अर्ज दाखल होते. तर सहा जागा निवडून द्यावयाच्या होत्या. सात उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने सुखदेव विठ्ठल मुळीक, बापूराव तात्याबा जगताप, झुंबर निवृत्ती सुद्रिक, सचिन सुभाष , प्रकाश आदिनाथ चेडे,हरिभाऊ धोंडीबा खेडकर हे बिनविरोध निवडून आले. भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्गातून एका जागेसाठी तीन अर्ज आले होते. यातील दोन उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने साहेबराव मल्हारी माने यांची बिनविरोध निवड झाली. उर्वरित १४ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी व्यक्तिगत सभासदांमधून दोन जागांसाठी ११ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी ६ उमेदवारांनी माघार घेतल्याने रामभाऊ साहेबराव टकले, चंद्रकांत काशीनाथ टकले, ज्ञानेश्वर लक्ष्मण गांगर्डे, दिलीप साहेबराव गांगर्डे, प्रकाश सिमरतलाल भंडारी हे निवडणूक रिंगणात राहिले आहेत. अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाच्या एका जागेसाठी दोन अर्ज आले होते. दोन्ही अर्ज राहिल्याने राजेंद्र नामदेव, वसंत विठ्ठल कांबळे या दोघांमध्ये सरळ लढत होणार आहे. महिला राखीवच्या दोन जागांसाठी सात अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी चार उमेदवारांनी माघार घेतल्याने मंगल सर्जेराव बावडकर व रत्नमाला गायकवाड, साधना बाळासाहेब देशमुख यांच्यात तिरंगी सामना होणार आहे. इतर मागास प्रवर्गातून एका जागेसाठी सहा अर्ज दाखल झाले होते. तीन जणांनी माघार घेतल्याने बबन सुदाम बनकर, दिलीप साहेबराव व रमेश हरिभाऊ बनकर हे तीन उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. निवडणुकीच्या रिंगणातून अनेकांनी माघार घेतल्याने निवडणुकीची रंगत कमी झाली आहे. (वार्ताहर)