लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : जिल्ह्यात तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली असून, जिल्ह्यात १४ केंद्र सुरू करण्यात आले आहेत. खरेदी केंद्रावर तुरीची खरेदी सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी तूर खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील तुरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. शासनाने तुरीसाठी प्रति क्विंटल सहा हजार रुपये भाव जाहीर केला आहे. जिल्ह्यातील दोन हजार शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली. ऑनलाईन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना मेसेज पाठविण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना ज्या दिवशी सांगितले आहे, त्या दिवशीच तूर केंद्रावर घेऊन यावी, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
तुरीची मळणी होऊन साधारण एक महिन्याहून अधिक कालावधी उलटून गेला आहे. सध्या बाजारात ५ हजार ते ५,५०० रुपये प्रति क्विंटल तुरीची खरेदी केली जात आहे. उशिराने सुरू होत असलेले खरेदी केंद्र, खरेदी केंद्रावर केली जाणारी प्रतवारी आणि पैसे मिळण्यास होत असलेला विलंब, यामुळे भाव कमी मिळत असूनही शेतकरी तूर व्यापाऱ्यांना देत आहेत. त्यात आता शासनाने हे खरेदी केंद्र सुरू केल्याने तूर खरेदीला वेग येणार आहे.
...
येथे सुरू झाले तूर खरेदी केंद्र
नगर - कृषी उत्पन्न बाजार समिती, साकत, पारनेर - कृषी उत्पन्न बाजार समिती, श्रीगोंदा - कृषी उत्पन्न बाजार समिती, मांडवगण, कर्जत - कर्जतकर फार्मर प्रोड्युसर कंपनी, कर्जत शहर, जामखेड - जामखेड शहर, खर्डा, पाथर्डी - पाथर्डी शहर, तीसगाव, शेवगाव - खरेदी विक्री संघ, राहुरी - खरेदी-विक्री संघ, संगमनेर - खरेदी विक्री संघ.