शिर्डी : राहाता तालुक्यातील जवळपास नऊ गावांमध्ये वीटभट्टीवर काम करणा-या १४०२ मजुरांना शुक्रवारी साईनगर रेल्वेस्थानकावरूनरेल्वेने उत्तरप्रदेशला स्वगृही रवाना करण्यात आले. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मजुरांना स्वगृही पाठविण्याचे राज्याच्या ग्रामिण भागातील सर्वात मोठे आॅपरेशन राहाता तालुक्यात राबविण्यात आले.एकीकडे मायभूमीत परतण्याचा आनंद या मजुरांना झाला होता. यामुळे मजुरांनी प्रशासनाला धन्यवाद देत विशेष रेल्वेने साईनगर स्थानकावरून लखीमपूरकडे कूच केले. दुपारी तीन वाजता ही रेल्वे लखीमपूर, उत्तरप्रदेश येथे रवाना करण्यात आली. प्रांताधिकारी गोविंद शिंदे, पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाकचौरे, साईबाबा संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, नायब तहसीलदार सचिन म्हस्के, शिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर वाकचौरे, पोलीस निरीक्षक नितीन गोकावे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले, मिथुन घुगे, रेल्वेचे स्थानकप्रमुख बी़एस़ प्रसाद, पोलीस निरीक्षक रामजी मीना, अनुप देशमुख यांच्यासह शंभरावर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.मायभूमीकडे परतणा-या मजुरांना संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण डोंगरे यांच्या आदेशानुसार प्रसादालय प्रमुख विष्णू थोरात यांनी प्रसादालय कर्मचा-यामार्फत अन्नाची पाकीटे दिली़ प्रवरा मेडीकल ट्रस्टने मास्क पुरवले. प्रशासनाने पाण्याचे पाऊच दिले़या मजुरांमध्ये साकुरी-४३७, राहाता-२१८, पिंपळस-९८, पुणतांबा-५५, खडकेवाके-२९, वाळकी-३५, रूई-६७ व एकरुखे येथील ८९ कामगारांचा समावेश होता. या सर्वांची गावपातळीवरच तपासणी करण्यात आली होती. या सर्वांचा सर्व्हे करणे, पैसे जमा करणे, तिकीट काढणे यात मंडलाधिकारी जाधव, ९ गावातील तलाठी, ग्रामसेवक व ५३ शिक्षकांचा समावेश होता.मजुरांना स्वगृही पाठवण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली नियंत्रण कक्ष प्रमुख उर्मिला पाटील, संदीप नचित, वैशाली आव्हाड, चंद्रशेखर शितोळे आदींनी पाठपुरावा केला. रात्री उशीरा रेल्वेची मान्यता मिळविली.औरंगाबाद घटनेतील मजुरांना श्रध्दांजलीदोन दिवसांपूर्वी १२५१ मजूर येथून रेल्वेने लखीमपुरला रवाना करण्यात आले. त्यावेळी टाळ्या वाजवून आनंदोत्सव व्यक्त करण्यात आला. कालच्या औरंगाबादच्या दुर्घटनेमुळे मात्र आजच्या निरोप समारंभावर दु:खाच सावट असल्याने या गोष्टी टाळण्यात आल्या. रेल्वे निघण्यापूर्वी कालच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मजुरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
साईनगरीतून १४०२ वीटभट्टी मजूर रेल्वेने उत्तरप्रदेशला मार्गस्थ; साईसंस्थानने दिली अन्नाची पाकिटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2020 3:42 PM