सुपा : पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथे देवीच्या यात्रौत्सवानिमित मंगळवारी निघालेल्या मांडव डहाळेच्या मिरवणुकीत गावातील १५५ बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. अंबिका देवीच्या दर्शनासाठी भाविक भक्तांचा मोठा जनसागर उसळला होता.शेतीसाठी बदलत्या काळात बैलांचा वापर कमी झाला. तशी बैलांची संख्या झपाट्याने कमी झालेली असताना गोरेगावमध्ये मात्र शेतीकामासाठी फारसा उपयोग नसला तरी शेतकरी गोठ्यातील दावणीला बैल आवर्जून सांभाळतात. वाहतुकीसाठी बैलगाड्या त्याही सुसज्ज स्थितीत आहे. शेतकऱ्यांचे हे वैभव समजले जाते. किमान एक लाखापर्यंत किंमत असणारी बैलजोडी असल्याने गावात दीड ते दोन कोटीपर्यंतचे बैल गोरेगावमध्ये असल्याचे सोन्याबापू नरसाळे यांनी सांगितले.पशुधनाने समृद्ध असलेला शेतकरी कष्टाळू असला तरी उत्सवप्रियता त्यांच्यात असल्याने सकाळीच गोरेगावकर शेतकरी आपली गाडी व बैल सजवून, गाडीत आंब्याच्या पानांचे डहाळे लावून वेशीबाहेर रांगेत गाड्या लावून थांबले होते. ताशा, ढोल, व सनईच्या मंजूळ सुरात मिरवणुकीला सुरवात झाली. पूर्ण गावाला प्रदक्षिणा घालताना देवीचे दर्शन घेऊन नंतर मिरवणुकीची सांगता झाली. मांडव डहाळेची मिरवणूक पाहण्यासाठी गावकºयांची गर्दी झाली होती. गावातील कारभारी मंडळींनी प्रत्येक गाडीवाणांचा श्रीफळ देऊन यावेळी सत्कार केला.
गोरेगाव येथे मांडव डहाळेच्या मिरवणुकीत १५५ बैलगाड्या सहभागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 5:11 PM