राजूर : कळसूबाई येथे देवीच्या दर्शनाला जात असताना संगमनेर तालुक्यातील कोठे व वनकुटे येथील सुमारे ३५ भाविक असलेली पीकअप जीप उलटून १६ जण जखमी झाले. हा अपघात तेरूंगण परिसरातील कोल्हार घोटी रस्त्यावर मंगळवारी पहाटे झाला. यातील सहाजण गंभीर जखमी असून, त्यांना प्राथमिक उपचारानंतर अन्यत्र हलविण्यात आले आहे.कोठे व वनकुटे येथील मधे परिवारातील सुमारे ३५ जण मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास वनकुटे येथून पीकअप जीप (एमएच १२ डीजी- ३७५८) घेऊन कळसूबाईच्या दर्शनाला निघाले होते. सकाळी साडेसहाच्या दरम्यान ही गाडी तेरूंगण शिवारातील रस्त्याच्या एका वळणावर उलटली. अपघातानंतर रस्त्याने जाणाऱ्या काही प्रवाशांनी तत्काळ १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेस कळविले. या रुग्णवाहिकेत गंभीर जखमींना ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले, तर काही जखमींना घाटघरहून राजूरकडे येणाऱ्या कारभारी मेंगाळ या तरुणाने आपल्या खासगी वाहनातून रुग्णालयात पोहोच केले. यात मच्छिंद्र नामदेव दुधवडे (रा.वनकुटे), महादू कमाजी केदार (हिवरगाव), लिला बबन मधे (कोठे), आनंदा गबा मधे (वनकुटे), मारूती नामदेव दुधवडे (भोजदरी), तुळसाबाई आनंदा मधे (वनकुटे), अर्चना नवनाथ काळे (बोटा), सुनीता दिलीप जाधव (बोरी, ता.जुन्नर), हरिभाऊ लक्ष्मण सांगळे (कुरकुंडी) व इतर सात अशा एकूण सोळा जणांवर येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. छाया लोहरे, डॉ. गभाले, डॉ. साळुंके व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी प्राथमिक उपचार केले. यात गंभीर जखमी झालेल्या मच्छिंद्र दुधवडे, महादू केदार व इतर चार जणांना नाशिक येथे हलविण्यात आले. पाच जखमींवर येथेच उपचार सुरू असून, पाच जखमींना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले. पोलीस दप्तरी वाहन चालकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. (वार्ताहर)
कळसूबाईला जाणारी जीप उलटून १६ भाविक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2016 12:43 AM