अहमदनगर : काेरोनाचे संकट गडद होत असतानाच नगर जिल्ह्यात म्युकरमायकोसिस रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. नगर शहरात म्युकरमायकोसिसचे १८ रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार घेत आहेत, अशी माहिती शहरातील डॉक्टरांनीच गुरुवारी एका बैठकीत दिली. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचीही चिंता वाढली आहे.
महापाैर बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या सभागृहात गुरुवारी शहरातील खाजगी कोविड रुग्णालयांच्या डॉक्टरांची बैठक झाली. या बैठकीत शहरातील डाक्टरांनी म्युकरमायकोसिस आजाराच्या वाढत्या प्रमाणाबाबत चिंता व्यक्त केली. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना हा आजार होत असून, यापूर्वी श्रीरामपूर, श्रीगोंदा या तालुक्यांतही असे रुग्ण आढळून आलेले आहेत. आरोग्यमंत्र्यांनी या अजारावर जनआरोग्य योजनेतून उपचार केले जातील, असे जाहीर केलेले आहे; परंतु या रुगणांवरील उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या औषधांचा तुटवडा आहे. या आजारील उपचार महागडे असल्याने ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे म्युकरमायकोसिस आजारावरील उपचारासाठी महापालिकेने ठोस पावले उचलावीत. तसेच याबाबत शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी बैठकीत डॉक्टरांकडून करण्यात आल्याचे महापालिकेच्या आरोग्य समितीकडून सांगण्यात आले. यावेळी आरोग्य समितीचे सदस्य तथा सभागृहनेते रवींद्र बारस्कर, निखिल वारे, सतीश शिंदे, सचिन शिंदे, लेखापरीक्षक प्रदीप मानकर, उपभियंता आर.जी. मेहत्रे आदी उपस्थित होते.
लहान मुलांमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढतेय
कोरोनाच्या पहिल्या लाटेत लहान मुलांना बाधा होण्याचे प्रमाण कमी हाेते; परंतु दुसऱ्या लाटेत लहान मुलांना बाधा होण्याचे प्रमाण मोठे असून, औरंगाबाद जिल्ह्यात दोन दिवसांत ३० मुलांना कोरोनाची बाधाचे झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे याबाबत तातडीने महापालिकेने उपाययोजना हाती घ्याव्यात, अशी सूचना यावेळी डॉक्टरांनी केली. त्यावर आरोग्य समितीने पुढील दोन दिवसांत शहरातील बालरोग तज्ज्ञांची बैठक घेणार असल्याचे सांगितले.
शहरातील खाजगी कोविड रुग्णालयातील डॉक्टरांची महापालिकेत बैठक आयोजित करण्यात आली होती. काेरोनावरील उपाययोजनांबाबत चर्चा सुरू असताना डॉक्टरांनी म्युकरमायकोसिस आजाराबाबत माहिती दिली असून, याबाबत उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
- डॉ. सागर बोरुडे, अध्यक्ष, आरोग्य समिती, महापालिका
मनपा उभारणार १५० ऑक्सिजनचे कोविड सेंटर -वाकळे
कोरोनाच्या गंभीर रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासते आहे. परंतु ऑक्सिजनचे बेड मिळत नाहीत. त्यामुळे रुग्ण व नातेवाइकांची धावपळ सुरू आहे. यासंदर्भात महापालिकेने उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला असून, महापालिका लवकरच १५० ऑक्सिजनचे बेड असेलेले कोविड सेंटर उभाणार असल्याचे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी या बैठकीत जाहीर केले. तसेच ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याबाबतही कार्यवाही सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.