शेवगाव : संजय गांधी निराधार व श्रावणबाळ निवृत्ती योजनेंतर्गत दाखल झालेल्या प्रस्तावांपैकी अठराशे प्रस्ताव फेटाळण्यात आले तर २५० प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. योजनेच्या लाभासाठी दाखल प्रस्तावांबाबत निर्णय घेण्यासाठी शेवगाव तालुकास्तरीय समितीची बैठक तहसील कार्यालयात पार पडली. या बैठकीत वयात तफावत तसेच कागदपत्रांमध्ये अपूर्तता आढळल्याने १ हजार ८०० प्रस्ताव नामंजूर करण्यात आले. त्यामुळे योजनेच्या लाभाच्या प्रतीक्षेतील अनेकांच्या पदरी निराशा आली. तहसील कार्यालयाने नामंजूर केलेल्या प्रस्तावांची संबंधितांना लेखी माहिती कळवून कागदपत्रांची पूर्तता करून हे सर्व प्रस्ताव पुढील बैठकीत पुन्हा मंजुरीसाठी ठेवण्याची मागणी भाजपचे शहराध्यक्ष रवी सुरवसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष दत्तात्रय फुंदे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, शेवगावचे तहसीलदार यांना निवेदने दिली आहेत. याबाबत दिरंगाई झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. गेल्या २ वर्षांपासून संजय गांधी निराधार योजना तालुकास्तरीय समिती कार्यान्वित नसल्याने ही समिती तातडीने गठीत करण्याची मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी) सध्या शेवगाव तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेची २८१७, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्त वेतन योजनेचे ६६६८, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेचे ८०४९ अशा एकूण १७ हजार ५३४ लाभार्र्थींना दरमहा १ कोटी ५ लख २५ हजार २०० रुपयांचे अनुदान वाटप करण्यात येत आहे.
१८०० प्रस्ताव फेटाळले
By admin | Published: June 29, 2016 12:47 AM