जामखेड : जामखेड व शेवगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाचा अडीच वर्षांचा कालावधी ८ आॅगस्टला संपत आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी या दोनही नगरपरिषद नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवड कार्यक्रम जाहीर केला असून १ आॅगस्टला निवड होणार आहे. तर नगराध्यक्ष पदासाठी (दि. २७ जुलै) रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत.जामखेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवड एक आॅगस्टला रोजी होणार असून निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कर्जत उपविभागीय अधिकारी अर्चना नष्टे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दि. २७ रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार आहे. व त्याच दिवशी छाननी होऊन वैध उमेदवाराची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.नामनिर्देशन पत्र छाननीत फेटाळले तर अपील दाखल करण्याची मुदत (दि. ३० जुलै) सोमवार सकाळी ५ वाजेपर्यंत आहे. त्याच दिवशी सायंकाळी अध्यक्ष पदासाठी वैधरित्या नामनिर्देशन सदस्यांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. १ आॅगस्ट रोजी आवश्यक असल्यास मतदान घेण्यात येणार आहे. उपनगराध्यक्ष पदासाठी १ आॅगस्ट रोजी १० ते १२ या कालावधीत नामनिर्देशन पत्र मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे नामनिर्देशन पत्र सादर करावे. नगराध्यक्ष निवडीनंतर उपनगराध्यक्ष निवड करण्यात येणार आहे.जामखेड नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. याकरिता गटनेत्या विद्या वाव्हळ व निखिल घायतडक हे दोघे पदाचे दावेदार आहे. तर उपनगराध्यक्ष पदासाठी बंडखोरी होण्याची शक्यता असून याकरिता १५ नगरसेवक इच्छुक आहेत.
१ आॅगस्टला जामखेड, शेवगावच्या नगराध्यक्षांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 2:07 PM