अकोलेत २ कोटी २७ लाखांचा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारल्यानंतर ऑक्सिजन सिलिंडर रिफिलिंग सेंटर प्रकल्पही उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प अकोले ग्रामीण रुग्णालयामध्ये साकारणार आहे. भविष्यात येथे उपजिल्हा रुग्णालय होणार असून त्यासाठी ऑक्सिजन प्लांट उपयोगी पडेल, असे आ. डाॅ. लहामटे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
ऑक्सिजन प्रकल्पास मंजुरी मिळाल्याचे स्पष्ट करत शनिवार त्यांनी अकोले शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. तहसीलदार मुकेश कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. इंद्रजित गंभिरे, नोडल अधिकारी डाॅ. शाम शेटे, डाॅ. अजित नवले, सुरेश गडाख, भानुदास तिकांडे, सुरेश खांडगे, चंद्रभान नवले, महेश नवले, प्रदीप हासे, नितीन गोडसे, सचिन शेटे, राजेंद्र सदगीर, बाळासाहेब आरोटे यावेळी उपस्थित होते.
तालुक्यात कोविड केअर केंद्रात ८५० बेड आहेत. सध्या ६५० सक्रिय कोविड रुग्ण असून २०० रुग्ण संगमनेर नाशिक व नगर येथे सोयीनुसार उपचार घेत आहेत. अकोलेत बेड शिल्लक आहेत. ऑक्सिजन बेडची कमतरता भरून काढण्यासाठी तालुक्यातील सर्व गुरुजन शिक्षक व सर्व पक्षीय कार्यकर्ते सक्रिय योगदान देत आहेत. सुगाव येथे शिक्षकांच्या पुढाकाराने ६० ऑक्सिजन बेडचे कोरोना सेंटर सुरू होत आहे. राष्ट्रवादी, भाजप, सेना, काँग्रेस अशा सर्वांचे सहकार्य मिळत आहे.
तालुक्यातील सरकारी आरोग्य यंत्रणा कोविड परिस्थिती सक्षमपणे हाताळत आहे. इतर तालुक्यांच्या तुलनेने अकोलेची सरकारी आरोग्य यंत्रणी चांगली आहे. ‘माझ्या घरात आईसह तीन कोरोना पेशंट होते. सरकारी यंत्रणेमुळे ते लवकर बरे झाले.’ नागरिकांनी घाबरून न जाता सरकारी कोविड सेंटरमध्ये सुरक्षित उपचार घ्यावेत. घरीच उपचार घेत थांबू नका. वेळेत कोरोना सेंटरमध्ये दाखल व्हा. सोशल मीडियावर राळ उठविण्यापेक्षा प्रशासनाच्या चुका लक्षात आणून द्या. मग आरोग्य यंत्रणेतील त्रुटी दूर करता येतील. तालुक्यात बेड शिल्लक आहेत, औषध साठा आहे, अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन लहामटे यांनी केले.
.........
नियम पाळा
तालुक्यातील कोविड स्थितीची माहिती तहसीलदार यांनी दिली. गावोगावी जिल्हा परिषदेच्या शाळेत विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले आहे. कोविड ग्रामरक्षक कमिट्या सक्षम करण्यात आल्या असून कोरोना नियम पाळले नाही तर आता फौजदारी गुन्हा दाखल होईल, असा इशारा तहसीलदार यांनी दिला.