प्रमोद आहेर शिर्डी : जगाला मानवतेचा संदेश देणाऱ्या साईबाबांचे संस्थान हे बाबांचा वारसा समर्थपणे पुढे चालवत आहे़ कोरोनाच्या संकटात मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी संस्थानने ५१ कोटींची मदत दिली आहे. तसेच संस्थानकडून स्थानिक पातळीवरही सामाजिक जबाबदारी पार पाडण्यात आली आहे, असे संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले़
शिर्डीजवळील निघोज येथील पालखी निवारा येथे बेघर लोकांसाठी निवारा केंद्र सुरू करण्यात आले आहे़ यात जवळपास दीडशे लोक वास्तव्यास आहेत़ त्यांना दोन वेळचे जेवण, स्वच्छता, आरोग्य तपासणी आदी सुविधा संस्थानकडून देण्यात येत आहेत़ साईबाबा संस्थानच्या साईआश्रम दोन या धर्मशाळेत संस्थात्मक विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे़ यात जवळपास ६४ पेक्षा जास्त व्यक्तींना ठेवण्यात आले आहे़ या सर्वांच्या जेवण, चहा, स्वच्छता याची जबाबदारी संस्थानने घेतली आहे़ कोपरगाव येथील ३०० व्यक्तींना दोन वेळचे जेवण संस्थानकडून पुरवण्यात येत आहे़ गेल्या पंधरवाड्यात संस्थानकडून जिल्हा पोलिसांना बुंदी व चिवड्याची सहा हजार पाकिटे तयार करून पाठवण्यात आली होती. शिर्डीत बंदोबस्तास असलेल्या पोलिसांचीही जेवणाची व्यवस्था संस्थानकडून करण्यात येत आहे़ संपूर्ण परिसराची स्वच्छता करून औषध फवारणी करण्यात आलेली आहे़शहरात घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करण्यासाठी संस्थानने नगरपंचायतला पाच नॉन कॉन्ट्रॅक्ट थर्मामिटर पुरवले आहेत़ याशिवाय नगरपंचायतच्या स्वच्छता व अन्य कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर, हॅन्डग्लोज, स्वच्छतेसाठी रसायन आदी संस्थानने उपलब्ध करून दिले आहे़ साईबाबा विमानतळावरही नॉन कॉन्ट्रॅक्ट थर्मामिटर व सॅनिटायझर देण्यात आले आहेत़ अनाथाश्रम, वृद्धाश्रम, पोलीस व इतर अशा जवळपास दोन हजार व्यक्तींना रोज दोन वेळचे जेवण पुरवण्यात येत आहे़ तसेस गेल्या पंधरवाड्यात कर्नाटकातून राजस्थानला जात असलेल्या अडीच हजार लोकांनाही संस्थानने जेवणाची पाकिटे तयार करून दिली असल्याचे डोंगरे यांनी सांगितले़