अहमदनगर : सावेडी उपनगरातील एक लाखाहून अधिक थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली असून, त्यांच्याकडून ८० टक्के थकबाकी वसूल करण्याचा आदेश आयुक्त शंकर गोरे यांनी मंगळवारी दिला.
आयुक्त शंकर गोरे यांनी सावेडी प्रभाग कार्यालयात आढावा बैठक घेतली. बैठकीतील उपायुक्त यशवंत डांगे, कर मूल्य निर्धारण अधिकारी सुनील चाफे, सावेडीचे कर निरीक्षक संजय उमाप आदी उपस्थित होते. सावेडी उपनगरात एकूण ५३ हजार २०० मालमत्ताधारक आहेत. एक लाखाहून अधिक थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांची संख्या ६१९ इतकी आहे. त्यांच्याकडे १९ कोटींचा कर थकलेला आहे. आयुक्तांनी सर्वात कमी वसुली असलेल्या तीन लिपकांची, तर सर्वाधिक वसुली करणाऱ्या तीन लिपिकांशी संवाद साधला. तसेच सावेडी प्रभाग कार्यालयातील कर वसुलीचा आढावा घेऊन वसुलीच्या सूचना केल्या.
थकीत कर वसुलीची मोहीम महापालिकेने सुरू केली आहे. चारही प्रभाग प्रभाग कार्यालयांची बैठक घेऊन आयुक्तांनी वसुलीचा आदेश दिला होता. त्यानंतर गोरे यांनी प्रभाग कार्यालयनिहाय आढावा बैठका सुरू केल्या आहेत. पहिली बैठक सावेडी प्रभाग कार्यालयाची घेण्यात आली. यावेळी आयुक्तांनी ८० टक्के थकीत कर वसूल करण्याचा आदेश दिला. सर्व प्रभाग कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभागांत रिक्षाद्वारे कर भरण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. तसेच एक लाखाहून अधिक थकबाकी असणाऱ्यांची यादी चौकात लावण्यात येणार आहे.
...
सावेडीत ८ कोटींची वसुली
सावेडी प्रभाग कार्यालयाने आतापर्यंत ८ कोटी ५० लाखांची वसुली केली असून, येत्या मार्चपर्यंत ८० टक्के वसुली करण्याचा आदेश आयुक्त गोरे यांनी दिला आहे. सावेडी प्रभाग समिती कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभागांतील एक लाखांहून अधिक थकबाकी असणाऱ्यांकडून कर वसूल करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. एक लाखाहून अधिक थकबाकी असणाऱ्यांना नोटिसा बजावण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.