अहमदनगर : कोरोनाबाधित आढळून आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील किमान २० लोकांचा शोध घेऊन त्यांची कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. तापाची लक्षणे असलेल्यांची कोरोना चाचणी बंधनकारक असून, अशा रुग्णांना कोरोना चाचणी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडे पाठविण्याची खासगी डॉक्टरांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन होते की नाही, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासकीय यंत्रणेतील वरिष्ठ अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत कोरोनाचा आढावा घेतला. त्यानंतर नियमांचे पालन केले जात नसेल तर कधीही लॉकडाऊन करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी गुरुवारी विशेष आदेश जारी करून कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचा आदेश दिला. जिल्ह्यातही कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता व्यक्त झाली असून, त्यावर तत्काळ नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे.
------------
सर्व कोविड केअर सेंटरची तपासणी करून ते उपचारासाठी सज्ज ठेवणे
कोविडबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या २० व्यक्तींचा शोध घेणे
संपर्कातील सापडलेल्या सर्व व्यक्तींची कोरोना चाचणी करणे
खासगी डाॉक्टरांकडून नियमित माहिती घेणे
तापाची लक्षणे असलेल्या संशयितांची आरटीपीसीआर चाचणी करणे
दूध विक्रेते, फेरीवाले, दुकानदार आदी नियमांचे पालन करीत नसल्यास कारवाई करणे
रुग्णांची संख्या वाढणारा भाग कन्टोन्मेंट म्हणून घोषित करणे
शाळा, महाविद्यालयात नियमांचे पालन आवश्यक
गर्दीच्या ठिकाणी नियम न पाळल्यास थेट कारवाई
मास्क न वापरणाऱ्यांवर फिरत्या पथकांद्वारे दंडात्मक कारवाई
एस.टी., खासगी वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्यास कारवाई
हॉटेल, रेस्टाॅरंट्सना ५० टक्के क्षमतेइतके ग्राहक राहणार
--------------------
लग्नसमारंभात नियम न पाळल्यास कारवाई
सध्या लग्नसमारंभांना मोठी गर्दी आढळून येत आहे. एका मंगल कार्यालयात पाचशे ते एक हजारांपेक्षा जास्त लोक जमा होत आहेत. तसेच अशा गर्दीच्या ठिकाणी नियमांचे पालन होत नसल्याचेही निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर लग्नसमारंभात एकाच वेळी ५० व्यक्ती राहणार नाहीत, याची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मंगल कार्यालयात मास्कचा वापर करताना आढळून न आल्यास त्याबाबत जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येणार आहे.
--------------
या नियमांचे पालन होणार
पाचपेक्षा जास्त लोकांची गर्दी दिसल्यास कारवाई
दुकानांची वेळ सकाळी ९ ते रात्री ९
रात्रीची संचारबंदी कायम
स्थानिक अधिकाऱ्यांच्या पथकांची नियुक्ती
------------