अरुण वाघमोडेअहमदनगर : राज्यातील ३० जिल्ह्यातील लाखो गुंतवणूकदारांना अब्जावधी रूपयांचा गंडा घालणाऱ्या मैत्रेय ग्रुपमध्ये नगर जिल्ह्यातून तब्बल दोनशे कोटी रूपयांपेक्षा जास्त गुंतवणूक झाली आहे़ गेल्या सहा दिवसांत दहा हजार गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे सादर केलेल्या कागदपत्रांवरून या गुंतवणुकीची व्यापकता समोर आली आहे़मैत्रेय ग्रुपच्या विविध योजनांतर्गत जिल्ह्यातील २६ हजार पेक्षा जास्त गुंतवणूकदारांनी एजंटांमार्फत पैसे गुंतविले आहेत़ यातील कुणाचेच पैसे परत मिळाले नाही़ अखेर १९ एप्रिल २०१८ रोजी या कंपनीत एजंट म्हणून काम करणारे सतीश पुंडलिक पाटील यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीवरून कंपनी समूहाच्या चेअरमन वर्षा सप्ताळकरसह संचालकांवर गुन्हा दाखल झाला़ हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झालेला आहे़ मैत्रेय ग्रुपमध्ये पैसे गुंतविलेल्या गुंतवणूकदारांनी आपले कागदपत्र सादर करावेत, असे आवाहन सात दिवसांपूर्वी आर्थिक गुन्हे शाखेच्यावतीने करण्यात आले होते़ या आवाहनानंतर सहा दिवसांतच दहा हजार गुंतवणूकदारांनी कागदपत्र सादर केले आहेत़ यामध्ये अनेकांनी लाखो रूपयांची गुंतवणूक या कंपनीत केली आहे़कंपनीच्या ३०८मालमत्ता जप्तमैत्रेय ग्रुपविरोधात राज्यात विविध जिल्ह्यात ३० गुन्हे दाखल आहेत़ या फसवणूक प्रकरणात दाखल गुन्ह्यांचा तपास तसेच कार्यवाहीमध्ये समन्वयाच्या दृष्टीने मुंबईत पोलीस महासंचालक कार्यालयात सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी मैत्रेय ग्रुपच्या आतापर्यंत राज्यातील ३०८ मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत़असे दाखविले आमिष१९९९ मध्ये मधुसूदन सत्पाळकर यांनी नेटवर्क मार्केटिंगच्या माध्यमातून मैत्रेय कंपनी स्थापन केली. मधुसूदन यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी वर्षा सत्पाळकर यांनी या कंपनीचा आणखी विस्तार केला़ गुंतवणूकदारांना सुवर्ण सिद्धी योजनेतून ३०० रुपयाच्या बदल्यात पाच वर्षांत ४० हजार आणि भूखंड देण्याचे आमिष दाखवले. तसेच आऱडी एफ डी व चिटफंड या माध्यमातून सर्वसामान्यांनी गुंतविलेले पैसे कंपनीने विविध व्यवसायात गुंतविले.
जिल्ह्यातून मैत्रेय गु्रपमध्ये एकूण किती जणांनी पैशांची गुंतवणूक केली आहे, याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. दररोज गुंतवणूकदार कागदपत्र घेऊन येत आहेत. ही सर्व माहिती संकलित करून गृहविभागाकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर ठेवीदारांच्या ठेवी परत करण्याबाबत निर्णय घेतले जातील.- प्रवीण भोसले, तपासी अधिकारी, आर्थिक गुन्हे शाखा