शेखर पानसरे
संगमनेर : सरकारमध्ये शेतकऱ्यांचे प्रतिनिधी कोण?, असे म्हणण्याची वेळ आलेली आहे. परिणामतः ही अवस्था आहे. शेतकऱ्यांचे दुखं जाणून घ्यायला सरकार तयार नाही. त्यांच्याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले. तसेच, जाहिरात बाजीवर कुणीही गतिमान होत नसतं. २०२४ ला राज्याच्या तसेच देशाच्या राजकारणात खूप मोठे बदल झालेले दिसतील, असे भाकीतही थोरात यांनी संगमनेर येथील आंदोलनादरम्यान केले. महावितरण कंपनीकडून वीजबिल वसुलीच्या नावाखाली कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येतो आहे. कांद्याला भाव मिळत नाही. महागाई वाढली आहे. शनिवारी (दि. ४) काँग्रेसच्यावतीने संगमनेर बसस्थानकाच्या बाहेर आंदोलन करण्यात आले. त्यानंतर आमदार थोरात यांनी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, संगमनेर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, एकवीरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सीताराम राऊत, मिलिंद कानवडे, रामहरी कातोरे, निर्मला गुंजाळ, सोमेश्वर दिवटे, नवनाथ अरगडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, संगमनेर तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, निखिल पापडेजा, सादिक तांबोळी आदी यावेळी उपस्थित होते. एका बाजूला शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळालेच नाही तर त्यांना त्यांचा संसार चालविणे कठीण होते. अशा परिस्थितीत विजेचे बिल ते कुठून भरतील. हेच सरकारमध्ये असणारी नेतेमंडळी, पदाधिकारी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री म्हणायचे की, ज्या पद्धतीने मध्यप्रदेशमध्ये वीजबिल माफ केले. त्याप्रमाणे महाराष्ट्रातही वीजबिल माफ करावे. आता त्यांनी वीजबिल माफ करावे. कारण या त्यांच्याच घोषणा होत्या. अशी टीका आमदार थोरात यांनी केली.