शिर्डी : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत शिर्डी नगरपंचायतीच्या पंचवीस रस्त्यांसाठी एकवीस कोटींच्या प्रस्तावास शासनाने मंजुरी दिली आहे़यात ऐशी टक्के रक्कम अनुदान मिळणार असून वीस टक्के म्हणजे जवळपास सव्वाचार कोटी रूपये नगरपंचायतचा सहभाग असणार आहे़कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांतून या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. परंतु वीस टक्के सहभाग देण्यासाठी नगरपंचायतकडे पुरेसा निधी नसल्याने साईबाबा संस्थानकडून हा निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत़ व्यवस्थापनाने या निधीसाठी मान्यता दिली असून न्यायालयाच्या मान्यतेसाठी हा प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येते़ यापूर्वी संस्थान निधीतून शहरातील अकरा रस्त्यांची कामे पूर्णत्वाकडे आहेत़ यातील एका रस्त्याचे भूसंपादन बाकी आहे़या रस्त्यांसाठी संस्थानने जवळपास ४३ कोटी रूपये दिले आहेत़ मात्र काही नागरिकांचा आडमुठेपणा व प्रशासनाची लवचिक भूमिका यामुळे एका रस्त्याचे काम रखडले आहे़शिर्डी नगरपंचायतचा २५़२५ कोटी रूपयांचा प्रस्ताव राज्यस्तरीय मान्यता व सनियंत्रण समितीसमोर ठेवण्यात आला होता़मात्र या समितीने दोन रस्ते वगळून उर्वरीत पंचवीस रस्त्यांच्या २१़०३ कोटी रूपयांच्या प्रस्तावास मान्यता दिली़ या प्रस्तावात मंजुर करण्यात आलेल्या रस्त्यांमध्ये विशेष करुन शिव रस्त्यांचा समावेश आहे़यामुळे शहराच्या विस्तारीकरणाला व दळणवळणाला गती येणार आहे़तसेच या रस्त्यांमुळे शहरातील नगर-मनमाड मार्गावरील गर्दी कमी होण्यासही मदत होणार आहे़ (तालुका प्रतिनिधी)
शिर्डीतील २५ रस्त्यांसाठी २१ कोटींचा प्रस्ताव मंजूर
By admin | Published: August 29, 2014 1:00 AM