श्रीरामपूर : अशोक सहकारी साखर कारखान्याच्या यंदाच्या १८७ दिवस चाललेल्या गळीत हंगामाची शनिवारी सांगता झाली. या हंगामात प्रथमच सुरू केलेल्या सहवीज निर्मिती प्रकल्पातून कारखान्यास वीज विक्रीतून २१ कोटी १६ लाख रूपयांची भरघोस कमाई झाली. कारखान्याच्या प्रथेनुसार माजी अध्यक्ष रावसाहेब थोरात यांच्या हस्ते विधीवत सांगता पूजा करण्यात आली. अध्यक्ष सुरेश गलांडे, उपाध्यक्ष माणिकराव शिंदे, राष्टÑवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब काळे, संचालक, अधिकार्यांच्या हस्ते गव्हाणीत शेवटची मोळी टाकून हंगामाची सांगता झाली. यंदाच्या हंगामात सुरुवातीस पावसाचा व्यत्यय, तर मार्च महिन्यात गारपीट व अवकाळी पावसामुळे अडचणी आल्या. त्यावर मात करण्यासाठी ६ ऊस तोडणी यंत्रांची उपलब्धता करण्यात आली. गारपीटग्रस्त शेतकर्यांचे नुकसान टाळण्यासाठी त्यांच्या ऊस तोडणीस प्राधान्य दिल्याने नियमित ऊस तोडीचा कार्यक्रम काहीसा लांबला. याच हंगामात सुरू झालेल्या सहवीज निर्मिती प्रकल्पाने पहिल्याच वर्षी वीज निर्मितीत जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे स्थान पटकाविले. या प्रकल्पातून कारखान्याचा वीज वापरता वगळता ३ कोटी ६४ लाख ३३ हजार युनिटस्ची महावितरणला प्रतियुनिट ५ रूपये ८१ पैसे दराने विक्री करण्यात आली. त्यातून कारखान्यास २१ कोटी १६ लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले. गळीत हंगामाची साखर उत्पादन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वीज प्रकल्प कार्यान्वित राहील. आॅईल कंपन्यांची मागणी पूर्ण झाल्याने इथेनॉल निर्मिती थांबविण्यात आली. तर हंगाम संपल्यानंतरही काही दिवस आसवनी प्रकल्प सुरू राहणार असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष सुरेश गलांडे व कार्यकारी संचालक भास्कर खंडागळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी) पन्नास हजार मेट्रीक टन उसाचे गाळप कारखान्याने ५ लाख ५० हजार ७८८ मेट्रिक टन उसाचे गाळप करुन ५ लाख ९० हजार साखर पोत्यांची निर्मिती झाली. या हंगामात २२ जानेवारी २०१४ रोजी एकाच दिवशी ३७१० मेट्रिक टन गळीत झाल्याने एका दिवसात सर्वाधिक गाळपाचा नवीन उच्चांक प्रस्थापित झाला. आसवनी प्रकल्पाद्वारे ४४ लाख ४२ हजार लिटर्स मद्यार्क निर्मिती व आॅईल कंपनीच्या मागणीनुसार १५ लाख लिटर्स इथेनॉल निर्मिती व पहिल्याच वर्षी कार्यान्वित झालेल्या सहवीज निर्मिती प्रकल्पाद्वारे ५ कोटी २८ लाख ६८ हजार युनिटस् वीज निर्मिती झाली. त्यातून ३ कोटी ६४ लाख ३३ हजार युनिटस्ची महावितरणला विक्री केली.
वीजनिर्मितीतून २१ कोटींची कमाई
By admin | Published: May 19, 2014 11:18 PM