प्रशांत शिंदे
अहमदनगर - जिल्ह्यातील २२३ गावे नदीकाठावर असून अतिवृष्टी झाल्यास या गावांना पुराचा धोका होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास जिल्हा प्रशासनाकडून आतापासूनच उपाययोजना केल्या जात आहेत. यासाठी लागणारे साहित्य जिल्हा व तालुका स्तरावरील कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून दिले जात आहे.
जिल्ह्यातील आठ प्रमुख नदी काठावरील २२३ गावांना पुराचा धोका होण्याची शक्यता असते. या नागरिकांची सुखरूप सुटका करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग तसेच इतर विभागातील अधिकारी कर्मचारी यांना सूचना करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील पर्जन्याची दैनंदिन माहितीसाठी ९७ महसूलमंडळांमध्ये ऑटोमॅटिक वेदर स्टेशन कार्यान्वित करण्यात आले आहेत. तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष २४ तास कार्यान्वित करण्यात आला आहे. दूरध्वनी क्रमांक ०२४१- २३२३८४४/२३५६९४० तसेच टोल फ्री क्रमांक १०७७ वर नागरिकांना संपर्क करता येणार आहे.