अहमदनगर: भरगोस व्याजाचे अमिष दाखवून मैत्रेय ग्रुप कंपनीने जिल्ह्यातील २६ हजार गुंतवणूकदारांना २३ कोटी रूपयांचा गंडा घातल्याचे समोर आहे. याबाबत कंपनीचे एजंट सतीष पुंडलिक पाटील यांनी गुरूवारी रात्री तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.याप्रकरणी पोलीसांनी कंपनीच्या अध्यक्षा वर्षा मधूसुदन सत्पाळकर (रा. वसई रोड जि. ठाणे,) संचालक विजय तावरे, लक्ष्मीकांत नार्वेकर व जनार्धन परूळेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पाटील हे २०१६ पासून मैत्रेय कंपनीत एजंट म्हणून काम करत होते़ गुंतवणूक केलेल्या पैशावर जादा व्याजदराचे अमिष दाखवून कंपनीने जिल्ह्यातील २३ हजार गुंतवणूकदारांकडून आर. डी. व एफडीच्या स्वरूपात गेल्या दोन ते अडिच वर्षांत २३ कोटी रूपये जमा करून घेतले. गुंतवणुकीची मुदत संपूनही गुंतवणुकदारांचे पैसे परत मिळाले नाहीत. हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.दरम्यान मैत्रेय या कंपनीत अनेक एजंटांच्या मार्फत जिल्ह्यातील हजारो जणांनी पैशांची गुंतवणूक केली आहे. मात्र ही कंपनीच डबघाईत अल्याने अनेकांचे पैसे अडकून पडले आहेत.