रविवारी (दि.९) यशोधन कार्यालयातील कोरोना मदत व सहायता केंद्राचे उद्घाटन आ. डॉ. तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. नगराध्यक्षा दुर्गा तांबे, काँग्रेसचे अहमदनगर शहराध्यक्ष किरण काळे, कार्याध्यक्ष सचिन गुजर, समन्वयक ज्ञानदेव वाफारे, संगमनेर तालुकाध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, शहराध्यक्ष विश्वास मुर्तडक, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष सुरेश झावरे, युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष सांगळे, शहर युवक अध्यक्ष निखिल पापडेजा, प्रा. बाबा खरात, नवनाथ आंधळे, सचिन खेमनर, पी. वाय. दिघे, विजय हिंगे आदी उपस्थित होते.
डॉ. तांबे म्हणाले, कोरोनाच्या पहिल्या लाटेत व यंदाही काँग्रेस कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने नागरिकांना मदत करीत आहेत. महसूलमंत्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्हा व संगमनेर तालुक्यासाठी ऑक्सिजन व्यवस्था सुरळीत करणे, औषधांची उपलब्धता करणे, शासकीय व खासगी हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून देणे. याचबरोबर कोरोना रुग्णांच्या सोयीसाठी संगमनेरात ५०० बेडचे अद्ययावत कोविड हेल्थ केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. तसेच आता यशोधन कार्यालयातील २४ तास हेल्पलाइन सुविधा केंद्रामुळे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील कोरोना रुग्ण व त्याच्या नातेवाइकांना मदत होणार आहे. बेड, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड, रुग्णवाहिका, प्लाझ्मा, औषधे उपलब्ध करून देण्यासाठी तत्परतेने मदत केली जाणार आहे. जिल्ह्यातील हे पहिलेच २४ तास हेल्पलाइन केंद्र असल्याचेही डॉ. तांबे म्हणाले.