अहमदनगर: निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो. या निसर्गाला स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. आज पर्यावरणाला सर्वांत जास्त भेडसावणारी समस्या म्हणजे प्लास्टिक. याचे भान ठेवून नगरच्या ट्रेक कॅम्प संस्थेने पर्यावरण दिनाचे औचित्य साधत ‘प्लॉगिंग ड्राईव्ह’ हा उपक्रम सुरू केला. त्याअंतर्गत सुमारे २५० ट्रेकर्सने शहराजवळील डोंगरगण येथील निसर्गरम्य आनंददरीत प्लास्टिकचा २० गोण्या कचरा उचलला.
ट्रेक कॅम्पचे संस्थापक विशाल लाहोटी यांच्या नेतृत्त्वाखाली ही मोहीम सुरू झाली. वांंबोरी घाटाखालच्या गणेश मंदिरापासून या मोहिमेचा प्रारंभ झाला. तेथे पोहोचल्यानंतर प्रथम सुखयोगाचे सागर पवार यांनी उपस्थितांकडून व्यायाम करवून घेतला. नंतर ट्रेकर्सच्या दोन टीम तयार करण्यात आल्या. प्रत्येकाला सुरक्षेसाठी हातमोजे देण्यात आले. ट्रेक करत असतानाच वाटेत दिसणाा्शस प्लॅस्टिकच्या बाटल्या, पिशव्या, तसेच काचेच्या बाटल्या उचलून गोण्यांमध्ये भरल्या जात होत्या. यात लहान मुलांबरोबरच तरुण व ज्येष्ठ नागरिकांचाही उत्साह वाखाणण्याजोगा होता. प्रत्येकजण एकमेकांना सहकार्याच्या भावनेने मदत करत होता.
आनंददरीत भटकंती करत तलावाच्या काठी सर्व गोण्या गोळा करण्यात आल्या. अंजली नृत्यालयाच्या करिश्मा कोठारी-जोशी यांच्या नेतृत्वाखाली कलाकारांनी ‘माइम आर्ट’च्या माध्यमातून ‘प्लॉगिंग ड्राईव्ह’वर आधारित भावनिक पण डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी नाटिका सादर केली. ही नाटिका सर्वांनाच भावली. या उपक्रमासाठी गौरव फिरोदिया, अनघा राऊत, सागर पवार, अक्षय सुडके, डॉ. सुनील पवार करिश्मा कोठारी-जोशी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.